जळगाव : औरंगाबाद - रावेर आणि जळगाव - पुणे या दोन बसेसचा समोरासमोर अपघात होऊन रावेर आगाराचे चालक शेख मोहसीन शेख आरीफ ३५ हे जखमी झाले असून, त्यांना अन्य एका बसमधून थेट जळगाव सिव्हिल येथे आणण्यात आले होते. सकाळी ९ वाजेच्या सुमारास सिल्लोड साखर कारखान्यासमोर हा अपघात झाला. दरम्यान, दोनही बसमधील प्रवासी सुखरूप असून, त्यांना अन्य दुसऱ्या बसेसने पोहोचविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
जळगाव - पुणे बसचे अचानक टायर फुटल्याने ही बस थेट औरंगाबाद - रावेर बसवर धडकली. या दोन्ही बसेसमध्ये अनुक्रमे ४० आणि ३५ प्रवासी बसले होते. यात रावेर आगाराचे चालक शेख यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना सिल्लोड येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर या प्रवाशांना सिल्लोड आगाराच्या अन्य बसेसने पुणे आणि रावेर येथे पोहोचविण्यात आले, तर एमएच २०, बीएल ३८८७ या बसमध्ये त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात आले. बस थेट रुग्णालयात आली होती. जीएमसीत डॉ. स्वप्निल कळसकर यांनी पाहणी करून आर्थोपेडिक यांच्या सल्ल्यासाठी शेख यांना डॉ. उल्हास पाटील रुग्णालयात पाठविण्यात आले.
अधिकारी रुग्णालयात
चालक शेख यांना जळगाव रुग्णालयात आणल्यानंतर विभाग नियंत्रक शिरीष चौधरी, स्थानकप्रमुख मनोज तिवारी, वाहक प्रताप कोळी यांनी रुग्णालयात येऊन चालकाची विचारपूस करून त्यांना पुढील उपचारासाठी गोदावरीत हलविण्यात आले. दरम्यान, सिल्लोड येथील बसचालक एस. एस. परदेशी हेदेखील शेख यांच्यासोबत आले होते.