रावेर : बंगलोर येथे आयटी पार्क मधील प्रोव्हाईस या सॉफ्टवेअरच्या खाजगी कंपनीत सेवारत असलेला येथील २४ वर्षीय सॉफ्टवेअर अभियंता स्वप्निल सुनील पाटील यास अचानक त्रास झाल्यानंतर शनिवारी रात्री उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. या घटनेपुर्वीच त्याने मित्रासोबत बोलतांना कामाचा अतिताण येत असल्याने पुणे येथे स्थलांतरित होण्याची इच्छा प्रकट केली होती. आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या स्वप्निलच्या अकस्मात मृत्यूने वाघोडसह रावेर शहरात शोककळा पसरली आहे.रावेर येथेील प्रोफेसर कॉलनीतील वाघोड येथील मुळ रहिवासी तथा साहित्यिक मधु वाघोडकर (मधुकर श्रावण पाटील) यांचे थोरले पूत्र सुनील पाटील यांचा स्वप्निल किराणा व जनरल स्टोअर्सचा प्रोफेसर कॉलनीत व्यवसाय आहे. सुनील पाटील यांचा स्वप्नील हा एकूलता एक मुलगा. गत वर्षभरापूर्वी पुणे येथील डी.वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात संगणकीय अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करून, स्वप्नील याने नोकरी पत्करली होती.शनिवारी साप्ताहिक सुटी असल्याने तो दिवसभर घरीच होता. सकाळी जिम मधून व्यायाम करून आल्यानंतर त्याला अस्वस्थ वाटत होते. खासगी डॉक्टरांनी रक्तदाब कमी झाल्याने औषधोपचार केले. तद्नंतर रावेर तेथील रहिवासी मित्रांकडे तो सुटी घालवण्यासाठी गेला होता. सायंकाळी रुमवर येतांना बसमधून उतरताना त्याला भोवळ आली. त्याने तत्क्षणी आपल्या नंदुरबार येथील मित्राला फोन करून बोलवले. त्याने स्वप्निलला खासगी रुग्णालयात हलवले असता, अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू असताना शनिवारी रात्री ७ वाजेच्या सुमारास त्याचा करूण अंत झाला.घटनेचे वृत्त वडील सुनील पाटील, आई संगिता पाटील, बहीण दामिनी, आजोबा कवी मधु वाघोडकर, आजी सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षीका सुमनबाई पाटील यांना कळताच जबर मानसिक धक्का बसून त्यांनी एकच हंबरडा फोडला. सुदैवाने त्याचे अमेरिकेत वास्तव्यास असलेले काका सॉफ्टवेअर अभियंता विक्रांत पाटील हे रावेरला घरी येण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते. त्यांना घटनेचे वृत्त समजताच त्यांनी आपल्या चुलत भावासोबत शनिवारी रात्रीच बंगलोरकडे विमानाने प्रयाण केले आहे.रविवारी दुपारी विमानाने मुंबईकडे येण्यासाठी स्वप्नीलचा पार्थिव घेऊन ते रवाना झाले असून रावेरला सोमवारी पहाटे ते शववाहिकेने येथे दाखल होणार असून सकाळी ८ वाजता रावेर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.स्वप्नीलचा मृत्यू कार्डीअॅक अॅरेस्टमुळे...बंगलोर येथील श्रीकृष्ण सेवाश्रम रूग्णालयात सॉफ्टवेअर अभियंता स्वप्नील यास दाखल केले असता, त्याचा कार्डीअॅक अॅरेस्टमुळे श्वासोच्छ्वास बंद पडून मृत्यू झाल्याचा दाखला निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. के. एम. राव यांनी दिला आहे.
रावेरच्या अभियंत्याचा कामाच्या तणावामुळे मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 08, 2019 9:50 PM