लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गिरणा धरणातून चार दिवसांपूर्वी सोडलेल्या २५०० क्युसेक पाण्याचा आवर्तनामुळे जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील बायपास या कामासाठी तात्पुरत्या स्वरूपात तयार केलेला कच्चा पुल वाहून गेला. मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पाण्यामुळे कामाच्या ठिकाणचे दोन पोकलँड व जेसीबी पुराच्या पाण्यात अडकून पडले. सुदैवाने या ठिकाणी काम करत असलेले कामगार देखील बालंबाल बचावले आहेत.
गिरणा धरणातून शुक्रवारी शेवटचे आवर्तन सोडण्यात आले होते. मात्र, याबाबत बायपासचा ठिकाणी काम करत असलेल्या कामगार व ठेकेदाराला याबाबतची माहिती देखील नसल्याने. अचानक आलेल्या या पुरात बायपासचा ठिकाणी तयार करण्यात आलेला पूल अचानकपणे वाहून गेला. यामुळे कामावर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. बायपासचे काम पूर्णपणे थांबले आता पुढील चार महिने देखील हे काम सुरू होण्याची शक्यता कमीच आहे.
पिलरसाठीचे पाईप वाहिले , लोखंडी रॉड देखील वाहून गेले
संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरणा नदीच्या आवर्तन आव्हाणे पर्यंत पोहोचले. जोपर्यंत पुराचे पाणी कच्चा पुलापर्यंत आले नाही तोपर्यंत या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना देखील याबाबतची कोणतीही माहिती नव्हती. पुराचे पाणी पुलापर्यंत पोहोचल्यानंतर कामगारांनी मिळेल ते साहित्य जमा करून त्या ठिकाणी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पाण्याचा वेग जास्त असल्याने पिलर साठीचे पाइप व लोखंडी रॉड पुराच्या पाण्यात वाहून गेले. तर या ठिकाणी काम करत असलेले दोन पोक लँड पुराचा पाण्यातच अडकून पडले.
एप्रिल महिन्यात देखील झाली होती दुर्घटना
एप्रिल महिन्यात देखील गिरणा नदीचे आवर्तन सोडण्यात आले होते. यावेळी देखील हा कच्चा पूल वाहून गेला होता. त्यामुळे पंधरा दिवस बायपासच्या पुलाचे काम थांबले होते. या कामाला गेल्या काही दिवसांपासून वेग आला होता. तसेच पावसाळ्यापूर्वी पीलर चे काम करण्यावर ठेकेदाराचा भर होता. मात्र मंगळवारी सायंकाळी गिरणा नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे कच्चा पूल वाहून गेला आहे. यासह शेतकऱ्यांसाठी तयार करण्यात आलेला पुल देखील वाहून गेला आहे. यामुळे नदीच्या पलीकडे असलेल्या शेतांमध्ये जायला शेतकऱ्यांना देखील रस्ता उरलेला नव्हता.
नदीच्या पाण्यामुळे अनधिकृत वाळू उपसा ही थांबला
मंगळवारी गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनामुळे नदीपात्रात पाण्याची पातळी वाढली आहे. यामुळे आव्हाणे, निमखेडी, खेडी या भागात सुरू असलेला अनधिकृत वाळूचा उपसा तात्पुरता देखील थांबला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नदीपात्रात १०० ते २०० डंपर द्वारे अनधिकृत वाळूचा उपसा सुरू होता. मात्र गिरणा नदीला आलेल्या पुरामुळे हा उपसा काही अंशी थांबला आहे. दरम्यान आवर्तना मुळे गिरणा काठवरचा गावांमधील पाणीटंचाईची समस्या देखील काही अंशी मार्गी लागली आहे. यासह केळी उत्पादक शेतकऱ्यांना देखील या आवर्तन मुळे फायदा होणार आहे.