ऑनलाइन लोकमत
रावेर, जि. जळगाव, दि. 13 - राज्याच्या बियाणे गुणनियंत्रण आयुक्तालय संचालकांच्या आदेशानुसार राशी 659 बीजी- 2 या कापूस बियाणांचे पाकीट तातडीने सील करून बियाणे विक्री बंद करण्याचे आदेश जारी होताच शनिवारी रावेर शहरासह तालुक्यातील सावदा येथील कृषी केंद्रांवरील 502 पाकीट सील करण्यात आले. रावेर पं. स.चे कृषी विस्तार अधिकारी एस.एस. काळेल यांनी ही कारवाई करीत विक्री बंद केली. दरम्यान, तालुक्यात राशी 659 बीजी 2 या वाणाची मागणी तब्बल आठ ते साडेआठ हजार पाकिटांची असताना केवळ 502 पाकीट अर्थात 5 ते 6 टक्के बियाणे सील केल्याने काळ्याबाजारासाठी काही पाणी तर मुरत नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पं.स. सदस्य दीपक पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाघाडी परिसरासह तालुक्यातील काही शेतक:ांनी राशी 659 बीजी - 2 च्या बियाणांची पाकिटे उपलब्ध करून देण्यात यावेत अशा मागणीचे निवेदन आज निवासी नायब तहसीलदार सी. एच. पाटील यांना देवून शासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. रावेर तालुक्यातील खरीप हंगामात कापसाचे सर्वसाधारण क्षेत्र 14 हजार 900 हेक्टर एवढे आहे. गतवर्षी 15 हजार 671 हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली आल्याने यंदा 15 हजार 730 हेक्टर क्षेत्र कापसाच्या लागवडीखाली येणे अपेक्षित असल्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्याकरिता 71 हजार 509 बीजी- 2(बीटी)कापसाची पाकिटे अपेक्षित असून, राशी 659 बीजी - 2बियाण्याची वाढती मागणी होती. गतवर्षी तालुक्यातील वाघोड येथे काही शेतक:यांच्या राशी 659 बीजी-2 या कपाशीच्या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याच्या तक्रारी होत्या. त्या अनुषंगाने राज्याच्या बी-बियाणे गुण नियंत्रण कृषी आयुक्तालय संचालकांनी राशी 659 बीजी- 2 या कापसाच्या वाणाची तातडीने विक्री थांबवून त्या बियाण्यांचा माल स्टॉकसील करण्याचे आदेश पारीत केले होते. त्या अनुषंगाने रावेर व सावदा शहरातील कृषी खरेदी केंद्रातील सदरील कापसाच्या वाणाचे 502 पाकीटांना स्टॉकसील करून विक्रीबंदची कारवाई रावेर पं स च्या कृषी विस्तार अधिकारी एस एस काळेल यांनी केली. तालुक्यात या कापसाच्या वाणाचे सुमारे आठ ते साडेआठ हजार पाकिटांची बुकींग झाली असताना कारवाई केवळ 502 पाकीट सील करून विक्रीबंदची करण्यात आलेली कारवाई ही खरोखरच कारवाई होती? की कारवाईचा नुसताच कांगावा केला गेला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रावेर व सावदा शहरातील विविध कृषी केंद्रांवर राशी 659 बीजी - 2 चे 502 पाकीट सील करून विक्रीबंदची कारवाई करण्यात आली आहे.- एस.एस. काळेल, बी - बियाणे गुण नियंत्रण विस्तार अधिकारी, पं स, रावेर.