जळगाव :
चार वर्षांपूर्वी केलेला वेतन करार ‘रेमण्ड’ कंपनीने यंदाही कायम ठेवला. त्यामुळे कामगारांच्या वेतनवाढीचा प्रश्न चव्हाट्यावर आला. तशातच ‘रेमण्ड’च्या पडद्यामागे सत्तासंघर्ष पेटला आणि कामगारांवर दबावतंत्र सुरु झाले. त्यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी दुसऱ्यादिवशीही ‘काम बंद’ आंदोलन सुरु ठेवले. या आंदोलनात सहभागी होण्यावरुन वाद पेटल्याने एमआयडीसी पोलिसांनी दहा जणांना अटक केल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. दरम्यान, सत्ताधारी मंत्र्यांच्या पाठबळातूनच कामगारांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे.
जगदीश तुकाराम बोरोले (वय ५०, ओमनगर), किशोर मुकूंदा पाटील, (५५, विठ्ठल पेठ), अनील भास्कर चौधरी (५५, अयोध्यानगर), चंद्रकांत पीतांबर लोखंडे (४४, नशिराबाद रोड), चेतन विनोद पाटील (३७, मेहरुण), योगेश्वर क्रिष्णा कोल्हे (५९, कोल्हेवाडा), हर्षल वासुदेव नेहते (३४, खेडीशिवार), संदीप पुंडलिक कोल्हे (४६, कोल्हेवाडा), मयूर किसन चौधरी (३३, भादली), राकेश पुंडलिक कोल्हे (५०, कोल्हेवाडा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात भा.दं.वि.३४१, ३४२, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. फिर्याद ‘रेमण्ड’ कंपनीचे सुरक्षा अधिकारी गिरधारी मारोती कुर्वे यांनी दिली आहे. आरोपींनी जितेंद्र जोशी अध्यक्ष असलेल्या कामगार उत्कर्ष संघटनेशी करार केल्याचा राग आल्याने ‘रेमण्ड’विरोधात घोषणाबाजी केली आणि मशिनरी बंद करुन कामगारांना काम करण्यास मज्जाव केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.