जळगाव : घरात साप निघाल्यानंतर त्याला मारण्याची तयारी सुरू असताना ती थांबविण्यात येऊन सर्प मित्राला बोलविण्यात आल्याने वन्यजीव सूचीमध्ये श्रेणी एकमध्ये समाविष्ट असलेल्या दुर्मिळ भारतीय अंडीखाऊ सापाला जीवदान मिळाले आहे. मेहरुण परिसरात आढळलेल्या या दुर्मीळ सापाची जिल्ह्यातील ही २३ वी नोंद आहे. वन्यजीव संरक्षण संस्थेच्या पुढाकाराने या सापाला सुरक्षितस्थळी सोडण्यात आले.
वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्प रक्षक वासुदेव वाढे यांनी मेहरुण परिसरातून वाचविला. ॲड. सूरज जहांगिर यांच्या निवासस्थानी हा साप निघाला. या दुर्मिळ सापाला न मारता सर्पमित्राला बोलावून त्याला जीवदान मिळाल्याने वन्यजीव संरक्षक संस्थेच्यावतीने नागरिकांचे आभार व्यक्त करण्यात आले. संस्थेचे मानद वन्यजीव रक्षक रवींद्र फालक यांच्या देखरेखीखाली व वनविभागाच्या मार्गदर्शनात सदर साप सुरक्षित आधीवसात मुक्त करण्यात आला.