अमळनेर,दि.2- किरकोळ कारणावरुन मामास लाकडी दांडय़ाने मारहाण करून, त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी आरोपी भाचा रोहिदास उर्फ पिंटू युवराज भिल (वडती) यास न्यायालयाने मंगळवारी 10 वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली. हा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी दिला.
वडती (ता.चोपडा) येथील रहिवासी रोहिदास उर्फ पिंटू युवराज भिल (35) हा किरकोळ कारणावरुन दारुच्या नशेत आईस मारहाण करीत होता. हे भांडण सोडविण्यासाठी मामा शांताराम भगवान भिल (35, रा.वडती) व राजेंद्र शालीग्राम जगताप (36, रा.रिधूर ता.जळगाव) आले. भांडण सोडविण्यासाठी आल्याचा राग आल्याने, रोहिदासने लाकडी दांडय़ाने दोघांना मारहाण केली. यात शांतारामच्या डोक्यावर जबर मार लागल्याने उपचार सुरु असताना 21 ऑगस्ट 2015 रोजी त्याचा मृत्यू झाला होता.
(वार्ताहर)