लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदावरून भाजपचे शिल्लक नगरसेवक व बंडखोर नगरसेवक आमने-सामने आले आहेत. बंडखोरांकडून भाजप गटनेतेपदावर दावा केला जात असून, त्यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, त्याआधीच भाजपचे गटनेते भगत बालानी यांनी विभागीय आयुक्त, महापौर व मनपा आयुक्तांना निवेदन देऊन बंडखोरांचा गटनेतेपदासाठीचा प्रस्ताव स्वीकारण्यात येऊ नये अशी मागणी केली आहे.
महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मध्यंतरी अपात्रतेच्या प्रस्तावावरून बंडखोर व भाजप नगरसेवकांमधील महाभारत गाजल्यानंतर आता गटनेतेपदावरून हे दोन्ही पक्ष पुन्हा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत.
काय आहे प्रकरण?
१. महापालिकेत भाजपचे एकूण ५७ नगरसेवक होते. त्यात महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीच्या वेळेस भाजपविरोधात थेट बंड पुकारून २७ नगरसेवकांनी सेनेला पाठिंबा दिला. त्यानंतर अजून ३ नगरसेवकांनी भाजप सोडून शिवबंधन बांधले. त्यामुळे बंडखोरीनंतर भाजपकडे ५७ पैकी २७ नगरसेवक शिल्लक आहेत.
२. तर बंडखोरांच्या गटात ३० नगरसेवक आहेत. या नगरसेवकांनी पक्षाविरोधात भूमिका घेतली असली तरी अजूनही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे अजूनही हे नगरसेवक भाजपचेच नगरसेवक आहेत. बंडखोरांकडे पक्षाचे अधिक नगरसेवक असल्याने भाजपचे गटनेतेपद बंडखोरांना मिळावे यासाठी बंडखोरांकडून विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविण्याचा हालचाली सुरू आहेत.
३. दुसरीकडे भाजप मात्र गटनेतेपद कायम राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. येणाऱ्या काळात आता हे पद कोणाकडे जाईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
..तर भाजपकडे एकही पद राहणे होईल कठीण
महापालिकेत सत्तेसोबतच भाजपचे अनेक पदेदेखील जात आहेत. सत्ता गमाविल्यानंतर महापालिकेत विरोधी पक्ष म्हणून भाजपच शाबूत होता. मात्र, हे पद देखील सत्तेत असूनही शिवसेनेकडेच आहे. भाजपचे सभागृह नेते ललित कोल्हे यांनीही बंड पुकारल्याने ते पददेखील भाजपकडे नाही. आता गटनेतेपददेखील गमाविल्यास भाजपकडे कोणतेही पद भविष्यात शिल्लक राहण्याची शक्यता नाही. स्थायी समिती सभापतीपद हे भाजपकडे असले तरी मात्र येणाऱ्या निवडणुकीत हे पददेखील भाजपच्या हातातून जाण्याची शक्यता आहे.
बंडखोरांच्या त्या प्रस्तावावर गटनेत्यांनी घेतली हरकत
बंडखोर नगरसेवकांकडून भाजपच्या गटनेतेपदावर दावा केला जात असून, यासाठी विभागीय आयुक्तांकडे प्रस्ताव दाखल होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपने हा प्रस्ताव दाखल होण्याआधीच या प्रस्तावावर हरकत घेतली आहे. भाजप गटनेते भगत बालानी यांनी विभागीय आयुक्त, महापौर व मनपा आयुक्तांकडे निवेदन सादर केले आहे. या निवेदनात म्हटले आहे की, भाजपचे काही सदस्य दुसरी आघाडीची नोंदणी करण्यासाठी अर्ज दाखल करणार आहेत. मात्र,त्यांच्याविरोधात आधीच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने अपात्रतेचा प्रस्ताव दाखल झाला असल्याने त्यांच्या प्रस्तावावर कोणताही विचार करण्यात येऊ नये, अशी मागणी गटनेत्यांनी केली आहे.