लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : भाजपमधून बंडखोरी करीत स्वत:ला पांडवांची बिरुदावली लावलेल्या बंडखोर नगरसेवकांकडे पांडवांमधील नैतिकतेचा एक तरी गुण आहे का? असा प्रश्न भाजपने केला आहे, तसेच बंडखोर नगरसेवकांमध्ये जरा ही नैतिकता असेल, तर त्यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन पोटनिवडणुकीत निवडून यावे, असे आव्हान भाजपचे महानगरचे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनी दिले आहे.
भाजपमधून फुटून सेनेला पाठिंबा दिलेल्या भाजपचे बंडखोर नगरसेवक व भाजपच्या नगरसेवकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. बंडखोर-निष्ठावंत अशा दोघांमध्ये आता एकमेकांना कौरव-पांडवांची तुलना केली जात आहे. गुरुवारी बंडखोर नगरसेवकांनी भाजपला कौरवांची उपमा दिल्यानंतर, शुक्रवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी यांनीही प्रसिद्धीपत्रक काढून बंडखोर नगरसेवकांना थेट आव्हान दिले आहे. या पत्रकात म्हटले आहे की, भाजप फुटीर नगरसेवक यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये स्वतःला पांडव व भाजपा निष्ठावंतांना कौरव म्हटले आहे. मात्र, पांडवांमधील नैतिकतेचा एक गुण तरी त्यांच्यात आहेत का? जर बंडखोरांमध्ये नैतिकता असती, तर नगरसेवकपदाचा राजीनामा देऊन पोट निवडणुकीत निवडून आले असते. जनतेने भाजपच्या चिन्हावर त्यांना निवडून दिले. हे जळगावच्या जनतेला माहिती आहे की, बंडखोरांच्या पक्षांतराचा हेतू काय होता, त्यामुळे जनतेला मूर्ख समजू नये, असेही या पत्रकात म्हटले आहे.
१०० कोटींचा निधी परत आणून आपली पत सिद्ध करा
भाजपमधून फुटून हे नगरसेवक विकासाचे कारण देत असले, तरी भाजपमधून फुटण्याचा हेतू काय होता, हे जळगावकरांना माहिती असल्याचे या पत्रकात म्हटले आहे, तसेच शहराच्या विकासाची पर्वा असेल, तर ज्या पक्षात गेले, त्या पक्षाची राज्यात सत्ता आहे, तसेच आता महानगरपालिकेत ही आहे. त्यामुळे बंडखोरांनी शासनाने स्थगिती दिलेले १०० कोटी निधी आणून त्यांची राजकीय पत सिद्ध करावी, असे खुले आव्हान भाजपने बंडखोरांना दिले आहे, तसेच बंडखोरांनी भाजपने काय करावे, असे फुकटचे सल्ले देऊ नयेत, असा सल्लाही या पत्रकाद्वारे देण्यात आला आहे.