जळगाव : गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे. यातच याचा पाठपुरावाही संथ गतीने सुरू आहे. या कामांचा अहवाल आठवडाभरात पाठविण्याच्या सूचना जि.प. प्रशासनाने केल्या असताना १५ दिवस उलटूनही हे अहवाल अद्यापही प्राप्त झालेले नाही.या पाणी योजनांंबाबत नुकत्याच झालेल्या जळगाव दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत योजना रखडत ठेवणाºया दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश ८ आॅक्टोबर रोजी दिले होते. यानंतर दोन दिवसात संबंधित सर्व उप अभियंत्यांना पाणी योजनेच्या कामांबाबत एका आठवड्यात अहवाल पाठवावे, अशा सूचना जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आल्या होत्या.जिल्ह्यात भारत निर्माण, महाजल, स्वजलधारा, राष्ट्रीय पेयजल कार्यक्रम आदी विविध योजनांमधून अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजनेचे काम मंजूर झाले व निधीही दिला. मात्र अनेक वर्ष होऊनही एकूण ४८५ ठिकाणी पाणी योजनांचे काम पूर्ण होऊ शकलेले नाही. यासर्व योजना पूर्ततेसाठी मार्च २०१९ पर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान गेल्या २ वर्षात केवळ २०९ योजनांचे काम पूर्ण झाले आहे.अपूर्ण पाणी योजनांबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या समित्या मार्च २०१९ पर्यंत काम पूर्ण करू शकतील व तशी तयारी दाखवतील अशांना मात्र यातून सूट मिळू शकते. तथापी किती पाणी योजना समित्यांवर गुन्हे दाखल होतात, याकडे संबंधित गावांचेही लक्ष लागून असून तातडीने ही कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जळगाव जिल्ह्यातील रखडलेल्या ४८५ पाणी योजनांचे अहवाल मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2018 3:45 PM
गेल्या ७ ते ८ वर्षांपासून जिल्ह्यात ४८५ पाणीपुरवठा योजनांचे काम रखडले आहे. मात्र संबंधित दोषींवर कारवाई करण्यास खूपच दिरंगाई होत आहे.
ठळक मुद्देजिल्हा परिषदेकडून दोषींवर कारवाईबाबत दिरंगाई१५ दिवस उलटल्यानंतरही अहवाल प्राप्त नाहीअहवालानंतर कारवाईबाबतचा निर्णय