लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन लसीचे १३ हजार ८६० डोस प्राप्त झाले आहेत. सोमवारी नाशिक येथून सायंकाळी सहा वाजता हे डोस आल्यानंतर आता मंगळवारी सकाळपासून केंद्रांना हे डोस वाटप करणार आहेत. सर्व केंद्रांवर लसीकरण सुरू राहून ते वेगात व्हावे, असे नियोजन असल्याची माहिती माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. समाधान वाघ यांनी दिली.
सोमवारी जिल्ह्यातील चारच केंद्रांवर लसीकरण झाले. यामुळे लस न आल्यास हे लसीकरण सर्वच केंद्रांवर ठप्प राहिले असते. मात्र, लसीचे डोस सायंकाळीच प्राप्त झाले. ज्या ठिकाणी कोव्हॅक्सिन डोस दिले हाेते. त्या ठिकाणी कोव्हॅक्सिनच डोस दिले जाणार असल्याचे डॉ. वाघ यांनी सांगितले. सोमवारी केवळ ७३० लोकांनी पहिला डोस घेतला तर ३५३ लोकांनी दुसरा डोस घेतला. मंगळवारी सर्व केंद्रांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील औषध शास्त्र विभागाच्या केंद्रातून वाटप केले जाणार आहे.