लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. यंदा जून किंवा जुलै दरम्यान बँकेची निवडणुक लागण्याची शक्यता आहे. या बँकेसाठी आतापर्यंत १३१४ ठराव प्राप्त झाले आहेत. त्यात विविध कार्यकारी सोसायटी यांचे ५३३ ठराव आहे. जिल्ह्यात ८७६ विविध कार्यकारी सोसायटी आहेत. त्या पैकी फक्त ५३३ विकासोंचे ठराव जिल्हा सहकार विभागाला प्राप्त झाले आहेत. त्याशिवाय इतर ७८१ सहकारी संस्थांनी आपले सदस्य ठराव पाठवले आहेत.
विविध कार्यकारी सोसायटी या जिल्हा बँकेच्या सदस्य असतात. तर इतर संस्था त्यांच्या स्वेच्छेने सदस्य होऊ शकतात. त्यासाठी उर्वरित ठराव येण्याआधी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाला. आता गेल्या काही दिवसआधीच राज्यातील सर्व सहकारी संस्थांची निवडणुक प्रक्रिया सुरू झाली. त्यात जिल्हा बँकेची निवडणुक जुन किंवा जुलैमध्ये होऊ शकते. त्यामुळे आता येत्या पंधरा दिवसात या संस्थांचे सदस्य ठराव देखील मागविले जाणार आहेत.