जळगाव : जळगाव जिल्ह्यासाठी बुधवारी सायंकाळी काेविशिल्ड ५६ हजार ६०० व कोव्हॅक्सिनचे १२ हजार डोस प्राप्त झाले असून तालुकास्तरावर याचे वाटप करण्यात आले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डाेस मिळत नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. केवळ १८ ते ४४ वयोगटाचेच लसीकरण सुरू होते. आता पुढील तीन ते चार दिवस हा साठा राहणार असून यात ७० टक्के लसीचे डोस हे ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी व ३० टक्के डोस हे १८ ते ४४ वर्षांसाठी राहणार आहेत.
४५ वर्षांवरील नागरिकांची जिल्ह्यात १४ लाख लोकसंख्या आहे. यात २ लाख ९ हजार १७४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर ३७ हजार २४४ नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. यात ६० वर्षांवरील नागरिकांचाही समावेश आहे. या वयोगटासाठी गेल्या ३० एप्रिलपासून केंद्रांवर लस नसल्याने लसीकरण थांबलेले होते. केवळ ज्या केंद्रावर लसी उपलब्ध होत्या, त्याच केंद्रांवर हे लसीकरण सुरू होते. त्यामुळे केंद्रांवर गर्दी झालेली होती. आता यात प्राधान्याने दुसरा डोस दिला जाणार आहे.
१८ ते ४४ वयोगटाची लोकसंख्या ही जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या ३५ टक्के असून ती साधारण १६ लाखांपर्यंत आहे. ऑनलाईन नोंदणी व केंद्र निवडल्यानंतरच संदेश आल्यानंतर लसीचा पहिला डोस या वयोगटातील तरुणांना घेता येणार आहे. यासाठी शहरातील चार केंद्र आहेत. १ ते ५ मे पर्यंत ३६६३ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. या वयोगटासाठी ६८ हजारांतील तीस टक्के लस राखीव राहणार आहेत.