जळगाव : सत्कारात कुठल्याही भेटवस्तू न स्वीकारता, त्यातून उभ्या राहिलेल्या मदतीतून गेले पंधरा दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालयात दाखल रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना फूड पॅकेट वाटपाचा एक आदर्श उपक्रम गेल्या सहा महिन्यांपासून विद्यार्थ्यांनी हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत आतापर्यंत दीड हजार रुग्णांना व त्यांच्या नातवाइकांना फूड पॅकेट वाटप करून ‘एक हात मदती’चा देण्यात आला आहे़
कोरोना काळात मू. जे. च्या माजी विद्यार्थ्यांनी अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेतला. मुकेश पाटील, विकास वाघ, श्रीराम राठोड, अजय मनुरे यांनी तब्बल शंभरावर मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले. विद्यार्थ्यांच्या या सेवेची महाराष्ट्रभरातून दखल घेण्यात आली. नंतर या विद्यार्थ्यांचे समाजाच्या विविध स्तरावरून, विविध संघटनांकडून सत्कार करण्यात आला. या सत्कारात कुठल्याही प्रकारची भेटवस्तू न स्वीकारता गरजवंत रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांची जेवणाची व्यवस्था व्हावी म्हणून फूड पॅकेटची मागणी हे विद्यार्थी करीत होते. या विद्यार्थ्यांना महापौर जयश्री महाजन, विजय बोरसे यांच्यासह धुळ्यातील जयश्री फाउंडेशनचे सहकार्य लाभले.
दररोज पन्नास फूड पॅकेट वाटप
दररोज या विद्यार्थ्यांकडून पन्नास फूड पाकिटाचे वाटप केले जाते. विशेष म्हणजे, निराधार व्यक्तींचीसुद्धा हे विद्यार्थी काळजी घेत आहे. रुग्णालयांसोबतच शहरातील विविध भागांमध्ये या विद्यार्थ्यांकडून अन्नदान केले जाते. त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची हे विद्यार्थी भेट घेतात.
चिमुकल्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न
रेल्वे स्टेशन, मू. जे. महाविद्यालय परिसर, तसेच बसस्थानक परिसरात भीक मागणाऱ्या लहान मुलांनासुद्धा या विद्यार्थ्यांना अन्नदान करून मदतीचा हात देण्यात आला आहे. या लहान मुला-मुलींचे भवितव्य धोक्यात असल्यामुळे वेळेप्रसंगी त्यांना चांगले जेवण नसते, आरोग्याची सोय नसते, शिक्षणाची व्यवस्था नाही. त्यामुळे अशा भीक मागणाऱ्या लहान मुलांचे सर्वेक्षण या विद्यार्थ्यांकडून केले जाणार आहे. त्यानंतर महिला व बाल कल्याण अधिकारी यांच्याकडे संपूर्ण परिस्थिती मांडून चिमुकल्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न विद्यार्थी करणार आहेत.