लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीमधून वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी तीन आमदारांनी शिफारस केली आहे. यामध्ये आमदार चिमणराव पाटील, शिरीष चौधरी, किशोर पाटील यांचा समावेश आहे.
गेल्या वर्षी कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने जिल्हा वार्षिक योजनांसाठी मिळणाऱ्या निधीमध्ये ६७ टक्क्यांनी कपात केली होती. यातही मिळणाऱ्या ३३ टक्के निधीतून कोरोना उपाययोजनांसाठी पन्नास टक्के निधी राखीव ठेवण्याचे निर्देश होते, तसेच आमदार निधीतून पन्नास लाख रुपयांपर्यंत निधी उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली होती. आता यावर्षी पुन्हा कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढल्याने शासनाने जिल्हा वार्षिक योजनांच्या निधीतून १० टक्के निधी तात्काळ उपलब्ध करून देत आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या, तसेच आमदार निधीदेखील उपलब्ध करून देण्यात शासनाने मान्यता दिली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचे आमदारांना पत्र
आमदार निधी खर्चाबाबत शासनाने मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनीदेखील जिल्ह्यातील आमदारांना पत्र देऊन आमदार स्थानिक विकास कार्यक्रम २०२१-२२ या आर्थिक वर्षाकरिता वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीबाबत निधीसंदर्भात पत्र दिले आहे. आपापल्या मतदारसंघांमध्ये करण्यात येणाऱ्या कामांविषयी शिफारस करावी, असे या पत्रात म्हटले आहे.
पाचोरा-भडगावात ऑक्सिजन प्लांटची मागणी
आमदार निधीमधून करण्यात येणाऱ्या कामाविषयी पाचोरा-भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांनी शिफारसीचे पत्र दिले आहे. यामध्ये पाचोरा ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन प्लांट करण्याकरिता ५० लाख रुपयांच्या निधीची शिफारस केली आहे. यासोबतच भडगाव ग्रामीण रुग्णालयासाठीदेखील ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी ५० लाख रुपयांची शिफारस केली आहे. त्यासोबतच मतदारसंघातील पाचोरा ग्रामीण रुग्णालय, भडगाव ग्रामीण रुग्णालय, पिंपळगाव हरेश्वर ग्रामीण रुग्णालय, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यासह इतरही आरोग्य केंद्रांवर रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी आमदार किशोर पाटील यांनी केली आहे.
एरंडोल मतदारसंघात ऑक्सिजन बेडची मागणी
आमदार चिमणराव पाटील यांनी दिलेल्या शिफारस पत्रामध्ये मतदारसंघातील मंगरूळ, तामसवाडी, गिरड, पिंपरखेड, तळई, रिंगणगाव, कासोदा या आरोग्य केंद्रांमध्ये प्रत्येकी दहा ऑक्सिजन बेड उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली आहे.
रावेर मतदारसंघात ड्युरा सिलिंडरची मागणी
आमदार शिरीष चौधरी यांनी दिलेल्या शिफारस पत्रामध्ये रावेर ग्रामीण रुग्णालयात व फैजपूर येथे सातपुडा कोविड केअर सेंटर या ठिकाणी प्रत्येकी दोन ड्युरा सिलिंडर उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.
इतर आमदारांच्या शिफारसींची प्रतीक्षा
जिल्ह्यातील तीन आमदारांनी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य खरेदीसाठी शिफारस पत्र दिले आहे. आता उर्वरित आमदारांच्या शिफारस पत्राची प्रतीक्षा असून, हे पत्र मिळाल्यानंतर त्या-त्या ठिकाणी वैद्यकीय यंत्रसामग्री व साहित्य उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.