लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आलेले डोस त्याच दिवशी संपविण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून सुरू करण्यात आले असून त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी एकाच दिवसात ५३ हजार ८९ जणांचे लसीकरण करण्यात आले यात. सर्वाधिक ३१ हजार नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. यात शहरातही पाच हजार नागरिकांनी लस घेतली आहे. मात्र, दुसऱ्याच दिवशी केंद्रांवर लसींचा ठणठणाट असून शनिवारी लस नसल्याने शहरातील लसीकरण केंद्र बंद होते. रविवारी पुन्हा ते बंद राहणार आहे. आता सोमवारीच लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.
जिल्ह्यात गुरुवारी विक्रमी लसपुरवठा झाला होता. त्यामुळे शुक्रवारी आजपर्यंत सर्वाधिक लसीकरण करणे आरोग्य विभागाला शक्य झाले आहे. लसींचा पुरवठा नियमित झाल्यास लवकरच ही मोहीम संपेल असा विश्वास आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. या आधी मागील आठवड्यात एकाच दिवसात ४९ हजार नागरिकांनी लस घेतल्याचा विक्रम झाला होता.
शहर आघाडीवर
शहरातील १ लाख ५४ हजार ३६५ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. ही संख्या अधिक असल्याने आता शहरात केवळ दुसऱ्या डोसला प्राधान्य दिले जात आहे. दुसरा डोस हा ७२३९१ नागरिकांनी घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोविशिल्ड लसीचे डोस हे दुसऱ्या डोससाठीच राखीव ठेवण्यात येत आहेत. तो घेण्यासाठीही केंद्रावर गर्दी उसळत आहे.
जळगाव ग्रामीणमध्ये अधिक लसीकरण
अमळनेर : ३१७१
भडगाव : २१६५
भुसावळ : ५९२६
बोदवड : १११९
चाळीसगाव : ४५०१
चोपडा : ३८७५
धरणगाव : २३९६
एरंडोल : १८३३
जळगाव : ४९४७
जामनेर : ३१५२
मुक्ताईनगर : २५७३
पाचोरा : २९८८
पारोळा : २९१३
रावेर : ३४८९
यावल : ३८५३
एका दिवसातील लसीकरण
पहिला डोस ३१३६६, शहरी : ४३७१, ग्रामीण : २६९९५
दुसरा डोस २१७२३, शहरी : १०२०९, ग्रामीण : ११५१४