लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा गेल्या ८ महिन्यांमधील सर्वाधिक लसपुरवठा हा गुरुवारी झाला. यात कोविशिल्ड लसीचे ५० हजार ३० तर कोव्हॅक्सिनचे २ हजार ८४० डोस प्राप्त झाले आहेत. यामुळे लसीकरण मोहिमेला अधिक गती येणार आहे. आलेले डोस एका दिवसात संपविण्याचे नियोजनही केंद्रावर सुरू असल्याची माहिती आहे.
लस उपलब्धतेबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी.टी. जमादार यांनी माहिती दिली. लस उपलब्ध नसल्याने गेल्या चार दिवसांपासून शहरातील लसीकरण केंद्र बंद करण्यात आले आहे. गेल्या सप्ताहात जिल्ह्याला कोविड प्रतिबंधात्मक लसीचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध झाला होता. त्यानुसार शनिवारी एकाच दिवसात ४९ हजारांहून अधिक नागरिकांना लसीकरण लाभ देण्यात आला होता. हे विक्रमी लसीकरण ठरले होते. त्यानंतर गुरुवारी जिल्हा आरोग्य प्रशासनाला नव्याने ५२ हजार ८७० डोस प्राप्त झाले.
शहराला ५ हजार डोस
शहरातील महापालिकेच्या केंद्रांसाठी २ हजार कोविशिल्ड तर ५०० कोव्हॅक्सिन देण्यात आले आहेत. तर रेड क्रॉस व रोटरी यांच्या केंद्रांना १५०० कोविशिल्ड व ५३० कोव्हॅक्सिन देण्यात आले आहेत. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली लसीकरण केंद्रे शुक्रवारी गजबजणार असल्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यातील ११८ लसीकरण केंद्राना प्रत्येकी ३०० ते ८०० या दरम्यान लसीचे वितरण करण्यात आले आहे. जळगाव तालुक्यात म्हसावद व नशिराबाद येथे प्रत्येकी १ हजार, भुसावळ तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, वराडसीम येथे प्रत्येकी १ हजार, कठोरा येथे ११०० तर पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे १ हजार याप्रमाणे लसीचा साठा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही डॉ. जमादार यांनी सांगितले.
एकूण लसीकरण : १२ लाख १२ हजार ८५४
पहिला डोस : ८९६९३८
दुसरा डोस : ३१५९१६