जळगाव : विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख यांच्याबद्दल विभागातीलच विद्यार्थ्याने केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने फेब्रुवारी महिन्यात गठीत करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीकडून चौकशीचे कामकाज सुरू झाले आहे. नुकतेच समितीने तक्रारीशी संबंधित विद्यार्थिनींशी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून जबाब नोंदवून घेतल्याची माहिती विद्यापीठ सूत्रांकडून मिळाली आहे.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील जनसंवाद व पत्रकारिता विभागाचे प्रमुख यांनी विभागातील विद्यार्थिनींना जादा गुण दिल्याची तक्रार विभागातीलचं विद्यार्थ्यांने दीड ते दोन वर्षांपूर्वी कुलगुरूंकडे केली होती. त्यासोबतच विद्यार्थ्याने प्राध्यापकाच्या प्रेम संवादाची ऑडिओ क्लिप ही कुलगुरूंकडे पुरावा म्हणून सादर केली होती. दरम्यान, ही क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर चर्चेला उधाण आले होते. शेवटी कुलगुरूंनी चौकशी समिती नेमल्यानंतर चौकशीच्या कामकाजाला सुरूवात झाली होती. मध्यंतरी समितीचे कामकाज थांबले होते. पुन्हा फेब्रुवारी महिन्यात निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय चौकशी गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या कामकाजाला सुरूवात झाली असून काही दिवसांपूर्वी समितीने विद्यार्थ्याच्या तक्रारीशी संबंधित त्या दोन विद्यार्थिनींशी सलग दोन दिवस व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून जबाब नोंदवून घेतले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. दरम्यान, ज्या शोध प्रबंधावर तक्रारदार विद्यार्थ्याने आक्षेप घेतला आहे, त्याची माहिती सुध्दा विद्यापीठाकडे समितीने मागितली असल्याची माहिती मिळाली आहे.