जळगाव : कारागृहातील बंदीवान चिन्या ऊर्फ रविंद्र जगताप याचा जेलर व त्याच्या सहका-यांच्या मारहाणीत मृत्यू झाल्याचा आरोप चिन्याच्या कुटुंबियांनी केला होता. या प्रकरणाशी निगडीत असलेले प्रत्यक्षदर्शी साक्षिदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष मंगळवारी जिल्हा न्यायालयातील न्या. डी. बी. साठे यांच्या न्यायालयात नोंदविण्यात आली. तर नाशिक मध्यवर्ती कारागृहातून चार बंदी साक्षी नोंदविण्यासाठी येणार होते. परंतु, गार्ड उपलब्ध न झाल्याने येऊ शकले नाहीत.
मंगळवारी या प्रकरणात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मनोज जाधव व सचिन कोरके यांची साक्ष नोंदविण्यात आली. चिन्या जगताप याच्या मृत्यू झाल्या वेळी तडकाफडकी जळगाव जिल्हा कारागृहातून नाशिक कारागृहात वर्ग करण्यात आलेले बंदी व चिन्या जगताप या मृत्यू प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अनिल चौधरी, नागेश पिंगळे, दिगंबर कोळी व गौरव पाटील यांची देखील मंगळवारी साक्षी नोंदविण्यात येणार होती. परंतु, नाशिक मध्यवर्ती कारागृहातून जळगाव न्यायालयात आणण्यासाठी गार्ड उपलब्ध न झाल्याने येऊ शकले नाही. नाशिक मध्यवर्ती कारागृहातील तुरुंगाधिकारी प्रशांत पाटील हे उपस्थित होते.