जळगाव : घरगुती ग्राहकांसह औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडे मोठ्या प्रमाणावर थकबाकीचा आकडा वाढला आहे. येत्या तीन दिवसात जळगाव परिमंडळातील सर्व लहान- मोठे औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांकडून १०० टक्के वीजबिल वसुली करण्याचा प्रयत्न करा, जे थकबाकीदार वीजबिल भरणार नाहीत. अशा ग्राहकांचा थेट वीजपुरवठा खंडित करा,असे आदेश महावितरणचे सर व्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना गुरुवारी जळगावातील मुख्य कार्यालयाती बैठकीत दिले. तसेच यावेळी त्यांनी दिलेले उद्दिष्ट पूर्ण न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सुचनाही या बैठकीत दिल्या.
कोरोनामुळे यंदा शासनाच्या सुचनेनुसार घरोघरी जाऊन रिडींग न घेता महावितरणने ग्राहकांना मार्च ते जुन पर्यंत सरासरी वीजबिल दिले. मात्र, महावितरणने दिलेले सरासरी बिल हे जादा असल्याच्या तक्रारी करित, अनेक ग्राहकांनी गेल्या वर्षी जूनपासून वीजबिल भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यामुळे जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यासह एकूण साडेतेराशे कोटींच्या घरात थकबाकीचा आकडा पोहचला आहे. या वसुलीसाठी महावितरणतर्फे थकबाकीदारांविरोधात कारवाई मोहिमही सुरू आहे. मात्र, २८ फेब्रुवारी पर्यंत वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी महावितरणच्या कोकण प्रादेशिक कार्यालयाचे सहव्यवस्थापकीय संचालक गोविंद बोडके यांनी जळगावी येऊन सर्व अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
या बैठकीला जळगाव परिमंडळाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर, अधीक्षक अभियंता फारूक शेख, प्रकाश पौणिकर, अनिल बोरसे, चंद्रशेखर मानकर,उपमहाव्यवस्थापक योगेश खैरनार उपस्थित होते. यावेळी बोडके यांनी जिल्हानिहाय थकबाकीची माहिती घेऊन, आता पर्यंत झालेल्या वसुलीची माहिती घेतली. यानंतर बोडके यांनी मागील १० महिन्यात थकबाकीचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. अशीच परिस्थिती राहिली तर दैनंदिन सेवेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या परिस्थितीवर मात करण्यासाठी १०० टक्के वीजबिल वसुलीशिवाय पर्याय नसल्याचेही बोडके यांनी सांगितले.
इन्फो :
वीजमीटरही काढुन आणण्याच्या सुचना
या बैठकीत बोडके यांनी ज्या ग्राहकांनी लॉकडाऊपासून वीजबिलच भरलेले नाही, अशा थकबाकीदार ग्राहकांना थेट वीज पुरवठा खंडित करुन, घरात वीजमीटरही न ठेवता काढुन आणण्याच्या सुचना केल्या. तसेच यावेळी त्यांनी महाकृषी ऊर्जा अभियानाची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्याचे आवाहनही केले.