जळगाव : मनपाच्या मुदत संपलेल्या मार्केटमधील गाळेधारकांना ८१ ची नोटीस बजाविल्यानंतर महिनाभरात गाळेधारकांकडून २० कोटी रुपयांची वसुली झाली आहे. तसेच गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी गाळेधारकांना ११ आॅक्टोबरची मुदत देण्यात आली होती. यामध्ये रविवारपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.११ आॅक्टोबर ही शेवटची मुदत होती. मात्र, काही गाळेधारकांनी थकीत रक्कम भरण्यासाठी मूदतवाढ करण्याची मागणी केल्यानंतर दोन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे शनिवार व रविवारी देखील महापालिकेचा किरकोळ वसुली विभाग सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत खुला राहिला. शेवटच्या दिवशी ६१ गाळेधारकांनी तब्बल ३ कोटी रुपयांची थकीत भाडे भरले. आतापर्यंत २०० हून अधिक गाळेधारकांनी भाड्याची रक्कम भरली असून, यामध्ये २९ गाळेधारकांनी पुर्ण रक्कम भरली आहे. तसेच २०० गाळेधारकांनी किरकोळ वसुली विभागातील अधिकाऱ्यांकडून थकीत रक्कम भरण्याबाबत माहिती घेतली आहे. दरम्यान, गाळेधारकांना थकीत रक्कम भरण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली. मात्र रविवारपर्यंत थकीत भाडे न भरल्यास मनपाकडून गाळे जप्तीची कारवाई करण्याचा इशारा मनपाकडून देण्यात आला होता.
गाळेधारकांकडून कोटींची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 1:44 PM