विजयकुमार सैतवाल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत असून रिकव्हरी रेटदेखील वाढत जाऊन ९७.८७ टक्क्यांवर पोहचला आहे. यामध्ये डेल्टा विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या रविवारपासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधादरम्यान रुग्णसंख्या कमी-कमी होत जाऊन आठवड्याभराच्या तुलनेत रुग्णसंख्या १४ टक्क्यांवर आली आहे. तर पॉझिटिव्हिटी केवळ ०.२० टक्क्यांवर आहे. जिल्ह्यातील ही दिलासादायक स्थिती पाहता आता सर्व निर्बंध हटवून व्यवहार पूर्वपदावर येण्याची प्रतीक्षा लागलेली आहे.
कोरोना संसर्गाच्या पाच टप्प्यातील पहिल्याच टप्प्यात जळगाव जिल्हा असला तरी जिल्ह्यात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून आल्याने २७ जूनपासून पुन्हा निर्बंध लावण्यात आले. यामुळे विविध व्यवसायांवर परिणाम होण्यासह रोजंदारी करणाऱ्यांपुढे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
बरे होणाऱ्यांचे वाढते प्रमाण, मृत्यूदर स्थिर
जिल्ह्यातील रिकव्हरी रेट पाहता तो वाढतच गेला आहे. गेल्या रविवारी, २७ जून रोजी ९७.६५ टक्के असलेला रिकव्हरी रेट वाढत-वाढत जाऊन आठवडाभरात रविवार, ४ जुलै रोजी तो ९७.८७ टक्क्यांवर पोहचला आहे. दररोज आढळून येणाऱ्या नवीन रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांचे प्रमाणदेखील अधिक आहे. विशेष म्हणजे मृत्यूदरदेखील स्थिरावला असून आठवडाभर तो १.८१ टक्क्यांवर कायम राहिला.
आठवडाभरात रुग्णसंख्या ३५ वरून केवळ पाचवर
बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असताना २ जुलैचा अपवाद वगळता नवीन रुग्णांची संख्या कमी-कमी होत गेली आहे. रविवार, २७ जून रोजी ३५ नवीन रुग्ण आढळून आले होते, ही संख्या रविवार, ४ जुलै रोजी केवळ पाचवर आली आहे.
पॉझिटिव्हिटीत दररोज घट
जिल्ह्यात दररोज रुग्णसंख्या कमी होत असल्याने पॉझिटिव्हिटी रेटदेखील झपाट्याने कमी होत आहे. रविवार, २७ जून रोजी ०.३७ टक्के असलेला पॉझिटिव्हिटी रेट कमी-कमी होत जाऊन रविवार, ४ जुलै रोजी ०.२० टक्क्यांवर आला आहे.
व्यवहार पूर्वपदावर येण्यास सकारात्मक चित्र
जिल्ह्यातील एकूण दिलासादायक स्थिती पाहता सर्वच व्यवहार पूर्वपदावर येण्यास सकारात्मक स्थिती असल्याने प्रशासनाने या बाबत विचार करावा, अशी मागणी व्यापारी, हॉटेल व्यावसायिक तसेच सर्वच वर्गातून केली जात आहे. संसर्ग कमी असल्याने डेल्टाची भीती नाही, त्यामुळे सर्व व्यवसायांना पूर्णवेळ परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा हॉटेल अँड टुरिझम डेव्हलपमेंट असोसिएशनतर्फे अध्यक्ष लेखराज उपाध्याय, सचिव संजय जगताप, जिल्हा वाईन डिलर असोसिएशनचे अध्यक्ष ललित पाटील आदींनी केली आहे.
दिलासादायक स्थिती दर्शविणारे आकडे
दिनांक-नवीन रुग्ण-मृत्यू-मृत्यूदर-रिकव्हरी रेट-पॉझिटिव्हिटी
२७ जून-३५-०-१.८१-९७.६५-०.३७
२८ जून-३६-०-१.८१-९७.६८-०.३३
२९ जून-३७-०-१.८१-९७.७०-०.३१
३० जून-१५-०-१.८१-९७.७३-०.३५
१ जुलै-१२-१-१.८१-९७.७६-०.१६
२ जुलै-२०-०-१.८१-९७.७९-०.२६
३ जुलै-१५-१-१.८१-९७.८४-०.२९
४ जुलै-५-१-१.८१-९७.८७-०.२०