कुंदन पाटील
जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखालील सामायिक अनुकंपाधारकांच्या यादीत पोलीस दलातील उमेदवारांचा समावेश करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या उमेदवारांना शासन सेवेत सामावून घेण्यासाठी प्रक्रिया सुरु केली आहे. त्यानुसार ‘क’ संवर्गातील १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची दि.४ ऑक्टोबर रोजी पडताळणी करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या सामायिक अनुकंपा प्रतीक्षा यादीत यापूर्वी पोलीस पाल्यांना संधी दिली जात नव्हती. वास्तविकता तरतूद असतानाही राज्यभरात पोलीस दलातील पात्र उमेदवारांचा प्रतीक्षा यादीत समावेश करण्यात येत नव्हता. त्यामुळे या उमेदवारांचे भवितव्य केवळ पोलीस दलातील रिक्त होणाऱ्या जागांवरच अवलंबून राहत होते. त्यामुळे काही जण वयोमर्यादेची अट ओलांडून बसत होते. ही बाब लक्षात आल्यानंतर पोलीस अधीक्षक एम.राजकुमार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आणि पोलीस दलातील अनुकंपाधारकांना जिल्हास्तरीय सामायिक यादीत स्थान देण्याची मागणी केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गृह सचिवांकडे प्रस्ताव पाठविला. त्यांनीही मंज़ुरी दिल्याने या २४ उमेदवारांच्या भवितव्याचा मार्ग मोकळा झाला.
७ जण होणार तलाठीसध्या जिल्हाधिकारी कार्यालयात ७ तलाठी व पुरवठा विभागातील ३ लिपीकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे ‘क’ संवर्गातील १५ उमेदवारांच्या कागदपत्रांची सुरुवातीला पडताळणी करण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांना लागलीच रिक्तपदांवर नियुक्ती देऊन त्यांना शासन सेवेत दाखल करुन घेण्यात येणार आहे.
यांना नोकरीची संधी‘क’ संवर्गातील छाया चैत्राम झटके (किनगाव), दामिनी धर्मेंद्र महाजन (जळगाव), शीतल राजेश राजपूत (जळगाव), रितेश विजय पवार (चाळीसगाव), सोनाली रमेश कोळी (जळगाव), हर्षल ब्रिजलाल पाटील (भुसावळ), सोनल विकास विचवेकर (भुसावळ), सुजाता चारुदत्त चौधरी (जळगाव), रेणूका रमेश पाटील (जळगाव), मृणाल मधुकर मेहरुणकर (अकोला), सुजर रामगोपाल यादव (भुसावळ), कवीता चंपालाल धनगर (वर्डी, चोपडा), दुर्गेश सुधाकर भालेराव (जळगाव) व श्वेता राजेंद्र ससाणे (नाशिक) यांच्यापैकी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांना या १० जागांवर संधी दिली जाणार आहे.