जळगाव: शहरातील अलिशान भाग असलेल्या नवी पेठेतील एका इमारतीत सुरु असलेल्या कुंटणखान्यात बुधवारी शहर पोलिसांनी धाड टाकली. तेथून पाच महिला व एका जणाला ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर रात्री जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नवी पेठेतील वासुदेव बद्रीनाथ बेहर्डे यांच्या मालकीचे घर एका महिलेने भाड्याने घेतलेले आहे. या घरात रहिवास करण्यासह कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती मिळाल्यावर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड, उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, गजानन बडगुजर, तेजस मराठे, योगेश पाटील, वैशाली पावरा, स्वप्नाली सोनवणे, अनिता वाघमारे यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी या इमारतीत धाड टाकली.
तेथे पाच महिला व एक तरुण मिळून आले. काही साहित्य व रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ज्या भागात हा कुंटणखाना सुरु होता तो भाग उच्चभ्रू मानला जातो. त्याशिवाय बँकांची संख्या देखील या भागात जास्त आहे. गेल्या आठ दिवसापासून या भागात पाळत ठेवण्यात आली होती.