आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,२७ : जुन्या भांडणाच्या वादातून गुप्तीने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी संदीप अशोक पाटील (वय २४,रा.रिधूर, ता.जळगाव) याला बुधवारी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवून एक वर्ष कैद,१ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची साधी शिक्षा सुनावली.
रिधूर येथील रहिवाशी विनोद दामू पाटील (कोळी) वय ३७ हे १४ फेब्रुवारी २०१३ रोजी दुपारी ३.३० वाजता घरी असताना संदीप अशोक पाटील हा त्यांच्या घरी आला. जुन्या वादातून त्याने विनोद पाटील यांना शिवीगाळ केली व नंतर गुप्तीने पोटावर, उजव्या हातावर व डाव्या पायावर हल्ला करुन त्यांना गंभीर दुखापत केली. तर दामू काशिराम पाटील यांने विनोदला खल्लास करुन टाक अशी चिथावणी संदीपला दिली होती. याप्रकरणी विनोद पाटील यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात संदीप पाटील व दामू पाटील या दोघांविरुध्द कलम ३०७, ४५२, ५०४,५०६, ४२७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासधिकारी तत्कालीन पोलीस निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी गुन्हाचा तपास करून न्यायालयात संशयिताविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले. अकरा जणांच्या झाल्या साक्षी प्रमुख जिल्हा व सत्र न्या. सविता बारणे यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात गुन्ह्यात फिर्यादी वैद्यकीय अधिकारी, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तपासधिकारी यांच्यासह ११ जणांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपी संदीप अशोक पाटील याला दोषी ठरवून कलम ३२४ नुसार १ वर्ष शिक्षा १ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिन्याची शिक्षा, तसेच भादवी कलम ४५२ नुसार १ वर्ष शिक्षा व १ हजार दंड ठोठावला आहे. सरकारपक्षातर्फे अॅड.प्रदीप महाजन यांनी कामकाज पाहिले.