अमळनेर, दि. 2- तालुक्यातील बहुतेक गावांना पाणी टंचाई भासू लागल्याने, सर्वत्र टॅँकरची मागणी होऊ लागली आहे. नगरपालिकेची लाखो रूपयांची थकबाकी असल्याने, पालिकेच्या विहिर, बोअरवरून टॅँकर भरू देण्यास पालिकेने तूर्त नकार दिल्याने, टॅँकर भरण्याच्या स्त्रोतांचे संकट उभे राहिल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
तालुक्यातील ग्रामीण भागात पाणी टॅँकर पुरविण्याचे स्त्रोत अमळनेर शहरात आहेत. नगरपालिकेच्या ताब्यातील इंदिराभुवन आणि सिंधी कॉलनीतील बोअर हे आटू लागले आहेत. तसेच अनेक महिन्यांपासून टॅँकर भरण्याची सुमारो 30 लाख रूपयांची रक्कम पंचायत समितीकडे पालिकेची थकबाकी आहे. वारंवार मागणी करूनही ती रक्कम पंचायत समितीने भरलेली नाही. त्यामुळे यापुढे टॅँकर भरू देण्यास नगरपालिकेने तूर्त नकार दर्शविला आहे.
बंगाली फाईलमधील एक विहीर अधिग्रहित करण्यात आली आहे. सद्दस्थितीत तेथून टॅँकर भरणे सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून पारा वाढल्याने, पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. अनेक गावांचे टॅँकर, व विहिर अधिग्रहणाचे प्रस्ताव येत आहेत. त्यामुळे येत्या 15 दिवसात टॅँकर कुठून भरावेत असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झालेला आहे.