मध्यंतरी सविताच्या घरी निमंत्रण द्यायला गेले होते़ ती कॉलेजला प्राध्यापिका असल्याने मुद्दाम तिची सुटी पाहूून गेले़ खूप दिवसांनी भेट झाल्याने दोघींना खूप आनंद झाला़थोड्या गप्पा झाल्यावर ती म्हणाली, चल मस्त कांदा भजी करते़ बोलतच आम्ही स्वयंपाक घरात गेलो़ रोज घड्याळाच्या काट्याप्रमाणे कामे उरकावी लागतात़ सकाळी लवकर उठून यांचा, मुलीचा, माझा टिफीन भरुन साडेदहाला कॉलेजला पोहोचावं लागतं़ बरं झालं. आज तू आलीस़ तुझ्याशी बोलल्याने बघ कसं फ्रेश वाटतं़ एकीकडे तिने कढईत तेल तापवायला ठेवून पीठ भिजवलं. कांदा, मिरची कापून भजी तळायला घेतली़ तोवर तिची मुलगी मनीषा आली़ मला बघून मावशी किती दिवसांनी आलीस गं़ वरदा काय म्हणते, विचारत भजी तोंडात टाकून मॉम मस्त झाली गं भजी सांगितलं़मनीषाने माझी आल्या आल्या दखल घेतल्याने मला आनंद झाला होता़ पण तिने हातपाय न धुता स्वयंपाकाच्या ओट्याजवळ जाणं मला अजिबात आवडलं नाही़ सविताने दोन ते तीन वेळा म्हटल्यावर मनीषाने हातपाय धुतले व भजीची प्लेट घेऊन सोफ्यावर जावून बसली़ सोबतीला मोबाइल होताच़ मग पाणी पिण्यासाठी तिने फ्रिज उघडला तर नेलपेंटच्या खूप बाटल्या पाहून मी न राहवून विचारलं, एवढ्या बाटल्या? त्यावर सविता म्हणाली, ‘अग आजकाल लग्नात कार्यक्रमासाठी नवीन ड्रेस, त्यावर मॅचिंग नेलपेंट, चपला असं लागतं मुलींना. आणि विशाखा आपल्याला नाही मिळालं गं हे असं़ पण मुलांच्या नशिबानं त्यांना मिळतंय आणि आम्ही दोघंही नोकरी करतोय़ शेवटी सगळं तिचंच तर आहे़ सगळं सगळं खरं होतं़ मलाही एकच मुलगी असल्याने मीही फारसं काही वेगळं करत नव्हते़ पण खर्चावर मर्यादा ठेवून दरवर्षी नवीन दप्तर, वह्या, पुस्तक, शाळेचा ड्रेस, शाळेची भरपूर फी भरत असले तरी प्रत्येक वेळी मुलीला जाणीव करून देत होते़ हे सगळं मिळायला पैसा लागतो आणि तो मिळविणयासाठी कष्ट लागतात़सविताकडून घरी आले. पण विचारचक्र सुरुच होतं. काळ खूप बदलला आहे़ आताच्या मुलांना बोलून फारसा फरक पडणार नव्हता़ त्यांची चूक नव्हतीच़ आमच्या वेळी आम्ही मोठ्या भावंडांची पुस्तके, वह्या, ड्रेस वापरत होतो़ शाळेत पायीच जायचो किंवा टिफीनमध्ये लोणचं, चटणी, पोळी असायची, असं सांगून काही उपयोग नव्हता़ आताच्या मुलांच्या हातात तळव्यात मावणाऱ्या भारी मोबाइलची श्रीमंती होती़ पालकांनी मुलांचे ‘लाड’ जरुर करावेत. पण प्रत्येक वेळी मागितलेली वस्तू त्यांना दिली पाहिजे, असं बंधन नसावं. मात्र बाहेरून आल्यावर हातपाय धुणे, घरी आलेल्या मोठ्या व्यक्तींना नमस्कार करणे़ संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणणे असे संस्कार तर आपण नक्कीच करू शकतो़-विशाखा विलास देशमुख, जळगाव
मना घडवी संस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:06 PM