चोपडा : पंचायत समितीच्या शिक्षण विभागामार्फत बदल्यांबाबत १२ एप्रिल शेवटचा दिवस होता. मात्र शासनाचे परिपत्रक एकाही प्राथमिक शाळेकडे न पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. गटशिक्षणाधिकारी व संबंधित लिपिक यांनी मार्गदर्शन न केल्यामुळे आज अचानक विनंती अर्ज देण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचा निरोप पोहचविल्याने शिक्षकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली. प्राथमिक शिक्षकांना एकाच तालुक्यात २० वर्षे नोकरीला झाले असतील अशा शिक्षकांच्या बदल्या जिल्ह्यातच; परंतु बाहेर तालुक्यात केल्या जातात. मे महिन्यात या बदल्या होत असतात. मात्र यंदा शासनाने बदल्यांबाबत २७ फेब्रुवारी २०१७ रोजी परिपत्रक काढले. या परिपत्रकानिहाय बदल्या होणार आहेत. मात्र हे परिपत्रकच शिक्षण विभागामार्फत शाळेकडे पाठविले नाही. मार्गदर्शन कोणीही केले नाही म्हणून संभ्रम निर्माण झाला आहे.तसेच आता नेहमीप्रमाणे आदिवासी आणि बिगर आदिवासी असे क्षेत्र न ठेवता अवघड क्षेत्र, सर्वसाधारण क्षेत्र, बदली वर्ष, बदलीसाठी निश्चित धरावयाची सेवा यासारखे दहा निकष ठरविण्यात आले आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने जिल्ह्यातील अवघड क्षेत्राची गावे घोषित करणे, शाळानिहाय रिक्त जागा घोषित करणे, शिक्षकांच्या याद्या प्रकाशित करणे, शिक्षकांकडून बदलीसाठी पसंतीक्रम घेणे यासारखी कामे झालेलीच नाही. अनेक गोष्टींबद्दल संभ्रम असल्याने शिक्षकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. सायंकाळी पंचायत समितीच्या शिक्षण विभागात शिक्षक जमले होते. राष्ट्रवादीचे शिक्षक तालुकाध्यक्ष सतीश बोरसे यांनी उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे. नाराजी व्यक्त करणाºया शिक्षकांमध्ये सतीश बोरसे, नामदेव कोळी, विलास पाटील, अनिल पाटील, राजेश पाटील, उज्ज्वल पाटील, धनराज पाटील, अमृत पाटील, भीमसिंग राजपूत आदींचा समावेश आहे. सदर शासन निर्णय केंद्राप्रमुखांमार्फत सर्व शांळामध्ये पाठविला आहे. परिपत्रक समजायलाही एकदम स्पष्ट आणि सोपे आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार सर्व कार्यवाही केली आहे. -एस.सी.पवार, गटशिक्षणाधिकारी, चोपडा
बदलीच्या प्रकारावरून शिक्षकांमध्ये संताप
By admin | Published: April 13, 2017 12:32 AM