एरंडोल : काँग्रेसच्या किसान सेलचे निवेदन
एरंडोल : तालुक्यातील शेतकऱ्यांनी एरंडोल येथे शेतकी संघात शासकीय खरेदी केंद्रावर नोंदणी केलेली आहे; परंतु गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे
शेतकऱ्यांचा माल मोजणी होत नसल्याची स्थिती तालुक्यात आहे.
आता पावसाळा सुरू झाला असताना शेतकऱ्यांचा माल कधी मोजला जाईल, माल साठविण्यासाठी गोडाऊनची सुविधा कधी उपलब्ध होणार, असे प्रश्न एरंडोल तालुका काँग्रेस किसान सेलच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केले आहेत.
दरम्यान, प्रांताधिकारी विनय गोसावी व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत शासकीय ज्वारी, मका खरेदी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले; पण उद्घाटनानंतर गोडाऊनचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. त्यामुळे नोंदणी केलेले शेतकरी शेतकी संघाकडे माल कधी मोजणार, असा जाब विचारत शेतकी संघ कार्यालयात खेट्या घालतात. आमच्याकडे गोडावून उपलब्ध नाही म्हणून माल मोजला जाणार नाही,
असे शेतकऱ्यांना सांगण्यात येते.
या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना काँग्रेस किसान सेलचे अध्यक्ष भास्कर यशवंत पाटील, गोरखनाथ भदाणे, काशीनाथ मिस्त्री, प्रकाश बाविस्कर आदी उपस्थित होते.