लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : १८ ते ४४ या वयोगटासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. ही नोंदणी तर होत आहे; मात्र जिल्ह्यात केंद्रच मिळत नसल्याने मोठी अडचण होत आहे. संध्याकाळी पाच वाजता केंद्र निवडीसाठी सुरुवात होते; मात्र काही सेकंदातच ते हाउसफुल होत असल्याने दररोज या वयोगटातील व्यक्तींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. केंद्र मिळत नसल्याने दहा दिवसात जिल्ह्यात या वयोगटातील केवळ ०.४१ टक्केच लसीकरण झाले आहे.
कोरोनाचा प्रतिबंध करण्यासाठी १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीला ४५ वर्षांच्या पुढील इतर आजार असलेल्या व्यक्ती व साठ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक यांचे लसीकरण सुरू झाले. त्यानंतर ४५ वर्षांच्या पुढील सर्वांचे लसीकरण सुरू झाले. आता १ मेपासून १८ ते ४४ या वयोगटातील लसीकरणाला सुरुवात झाली; मात्र यात अनेक अडचणी येत आहेत. नोंदणी होऊनही जिल्ह्यात केंद्रच मिळत नसल्याने ते अडचणीचे ठरत आहे. जळगावातील रहिवासी असलेले तरुण जिल्ह्यात मिळेल त्या केंद्रांवर लस घ्यायला जात असल्याने वाद वाढले आहेत. शहरातील तरुण ग्रामीणमध्ये, तर ग्रामीणमधील शहरामध्ये असे विरोधाभासी चित्र या केंद्राच्या निवडीवरून समोर आले आहे. केंद्र काही सेकंदात बुक हाेत असल्याने तक्रारींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.
सायंकाळी पाच वाजता रहा तयार
तरुण सायंकाळी ५ ते ६ या वेळेत ऑनलाइन बसून असतात; मात्र केंद्रावर क्लीक करण्याआधीच केंद्र बुक होऊन जात असल्याने हा नेमका काय प्रकार आहे, अशी विचारणा तरुणांकडून होत आहे. त्यातच आता सिक्युरिटी कोडचा नवा ऑप्शन आल्याने तो टाकेपर्यंत केंद्र बुक होत असल्याने नेमकी लस आता मिळणार कधी? दिवसभर ऑनलाइन बसून राहायचे का? असा प्रश्न तरुणांमधून उपस्थित केला जात आहे. यात काहीतरी मार्ग काढावा व लसीकरण मोहीम सुलभ करावी, अशी मागणी होत आहे.
१८ ते ४४ वयोगटाचे झालेले लसीकरण - ६६८५
१८ ते ४४ वयोगटातील एकूण लोकसंख्या - १६,००,०००
१८ ते ४४ वयोगटातील लसीकरण झालेल्यांची टक्केवारी - ०.४१ टक्के
एक आठवड्यापासून प्रयत्न करतोय
अठरा वर्षाच्या पुढील वयोगटासाठीदेखील लसीकरण सुरू झाल्याने दिलासा मिळाला; मात्र यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागत असल्याने त्यात अनेक अडचणी येत आहेत. लसीकरण सुरू झाल्यापासून नोंदणीचा प्रयत्न करीत आहे; मात्र केंद्र मिळत नाही.
- आशुतोष बारी
कोरोनापासून बचाव करण्यासाठी लस आल्याने आनंद झाला. बाहेर कामानिमित्त जावे लागत असल्याने लसीमुळे आपले संरक्षण होईल, असे वाटत असताना नोंदणी होत नसल्याने लस कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
- नीलेश जाधव
गेल्या आठ दिवसांपासून दररोज केंद्र मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहे; मात्र संध्याकाळी अथवा केव्हाही प्रयत्न केला तरी केंद्र मिळत नसल्याने अजूनही लस घेता आलेली नाही.
- योगेश महाजन.
लसीकरणासाठी नोंदणी व केंद्र मिळवण्यासाठी अनेक जण प्रयत्न करीत आहे. सायंकाळी पाच वाजेनंतर सुरुवात होताच काही वेळातच ते फुल होत आहे. हा केवळ जळगावातच प्रश्न नसून देशभरात अशी स्थिती आहे.
- डॉ. राम रावलाणी, प्रमुख वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका.