कोरोनाच्या काळात सध्या अहमदाबाद ते जळगाव नियमित सेवा सुरू असली तरी, गेल्या सहा महिन्यांपासून मुंबईची विमानसेवा आठवड्यातून एकच दिवस सुरू आहे. यामुळे जळगावहून मुंबईला जाणाऱ्या व्यापारी व उद्योजकांची गैरसोय होत आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी झालेल्या विमानतळ विकास समितीच्या बैठकीत सदस्यांनीही नाराजी व्यक्त करून, मुंबईची विमानसेवा नियमित सुरू ठेवण्याची मागणी केली होती. मात्र, राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे राज्य शासनातर्फे खबरदारी म्हणून मुंबई विमानतळावरील अनेक विमान कंपन्यांच्या उड्डाणांना बंदी घातली आहे. यात जळगावला विमानसेवा देणाऱ्या विमान कंपनीचाही समावेश आहे.
दरम्यान, गेल्या महिन्यात राज्य शासनाने मुंबई विमानतळावरील काही निर्बंध उठवून, २ मार्चपासून आठवड्यातून चार दिवस मुंबईची विमानसेवा होणार होती. मात्र, मुंबई विमानतळावर स्लॉट न मिळाल्याने ही सेवा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर शासनाने गेल्या आठवड्यात टर्मिनल-१ सुरू करण्याची घोषणा केल्यामुळे, १२ मार्चपासून जळगावाहून मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होणार होती. मात्र, राज्य शासनाने वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा निर्बंध घातल्यामुळे, मुंबईची विमानसेवा पुन्हा स्थगित झाली आहे.
इन्फो :
मार्च अखेरपर्यंत नियमित सेवेची शक्यता नाही
विमान कंपनीतर्फे मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने, राज्य शासनातर्फे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये मुंबई विमानतळावर अतिमहत्त्वाच्या मर्यादित उड्डाणांनाच परवानगी देण्यात आली आहे. जोपर्यंत राज्यातील कोरोनाचा संसर्ग कमी होत नाही, तोपर्यंत विमानतळावरील निर्बंध कडक राहणार आहेत. त्यामुळे मार्चपर्यंत मुंबईची विमानसेवा नियमित सुरू होणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले. तर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व खबरदारी घेऊन, नियमित विमानसेवेला शासनाने परवानगी देण्याबाबत प्रयत्न सुरू असल्याचेही विमान कंपनीतर्फे सांगण्यात आले.