जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील बाबू जगजीवनराम मुलींच्या वसतिगृहात आॅरगॅनिक वेस्ट कंपोस्टींग मशिन बसविण्यात आले असून त्याचे उद्घाटन सोमवारी कुलगुरू प्रा़ पी़पी़पाटील यांच्याहस्ते करण्यात आले़वसतिगृहामध्ये उरलेले अन्न बाजूला काढले जाते. त्या अन्नाची विल्हेवाट लावणे आता या मशिनमुळे सुलभ झाले आहे. या मशिनमध्ये दररोज २५ किलो जैविक कचरा टाकून त्याचे रुपांतर खतामध्ये केले जाते. विद्यापीठ परिसरातील झाडांच्या पालापाचोळ्याची विल्हेवाट देखील या मशिनद्वारे लावता येणार आहे. जैविक कचऱ्याचे खतात रुपांतर ताबडतोब होऊन निसर्गाची जोपासना होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी कुलसचिव भ.भा.पाटील, अधिष्ठाता प्रा.ए.बी.चौधरी, व्य.प.सदस्य डॉ.रत्नमाला बेंद्रे, प्रा. भुषण चौधरी, निरज एंटरप्रायझेसचे किशोर पवार उपस्थित होते. हे मशिन भविष्यात सर्व वसतिगृहामध्ये लावण्याचा विद्यापीठाचा मनोदय आहे.