लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : रेमडेसिवीरच्या किमतीवर आता प्रशासनाने नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. रेमडेसिवीर हे इंजेक्शन एमआरपीवर न विकता ज्या किमतीत होलसेलरला मिळाले आहे. त्याने त्यापेक्षा १० टक्के अधिक कर एवढी किंमत आकारून त्याची विक्री करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले आहे. त्यामुळे आता संपूर्ण जिल्ह्यात रेमडेसिवीर हे इंजेक्शन एमआरपीपेक्षा कमी किमतीत मिळणार आहे.
जिल्हाधिकारी राऊत यांनी शनिवारी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, होलसेल औषधी डीलर्स आणि औषध विक्रेता यांच्याकडून रेमडेसिवीर व कोविडसंबंधित औषधांचा पुरवठा प्राधान्याने शासकीय कोविड रुग्णालये तसेच जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून कोविड १९च्या उपचारांसाठी मान्यता दिलेल्या खासगी रुग्णालये यांना करण्यात यावा.
रेमडेसिवीर व कोविडसंबंधित औषधांचे दर रुग्णांकडून आकारताना संबंधित रुग्णालये व विक्रेते यांनी त्याची जास्तीत जास्त किंमत (एमआरपी) न आकारता खरेदीची किंमत व १० टक्के कर इतकी किंमत आकारून त्यांची विक्री करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
सध्या रेमडेसिवीर या औषधाचा वापर नियंत्रित स्वरूपात करण्यासाठी ते केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनवर रुग्णालये व संस्थात्मक वापरासाठी पुरवठा करण्यात यावा, असे सुचविले आहे. तसेच टोसॅलिझुमॅब व रेमडेसिवीर या औषधांचा काळाबाजार करून विक्री करू नये, बेकायदेशीर मार्गाने हे औषध खरेदी करून त्याची विक्री करू नये. असे करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला औषधांचा पुरवठा करू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय कुणालाही कोविडशी संबंधित औषधे देऊ नयेत. या आदेशाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही याची तपासणी करण्याचे अधिकार अन्न व औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्तांना देण्यात आले आहेत.