वृद्धांनीही दिले आशिर्वाद : जळगावातील तनुजने व्यक्त केले प्रेम
जळगाव,दि.28- लहानपणापासूनच आजीचा लाडका असलेल्या तनुजला आपल्या आयुष्याचा प्रत्येक आनंदात आजीला सामावून घेण्याची सवय होती. डिसेंबर 2016 मध्ये तनुजच्या घरी लगची बोलणी सुरू होती, नातवाच्या लगAासाठी आजीदेखील अगदी आनंदात होती. मात्र एके दिवशी आजींची तब्येत बिघडते व यात आजींचे निधन होते. तनुजला आजी जाण्याचे दु:ख फार मोठे होते. त्यामुळेच आजीची कमतरता आपल्या साखरपुडय़ात भासू नये म्हणून तनुजने सोमवारी सावखेडा शिवारातील ‘मातोश्री’ वृध्दाश्रमात आजी-आजोबांच्या उपस्थितीत प्रीती सोळुंखे हिच्या सोबत साखरपुडा करून आपल्या आजीची कमतरता भरून काढली.
धरणगाव तालुक्यातील नांदेड-साळवा हे मूळ गाव असलेला तनुज सैंदाणे हा नांदेड ला जलसंपदा विभागात वरिष्ठ साहाय्यक या पदावर कार्यरत आहे. तनुजच्या लग्नासंदर्भात जोरदार तयारी सुरू असताना. तनुजची आजी रुख्मिणी सोनवणे यांचे अचानक निधन झाले. आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या क्षणी लाडक्या आजीचे निधन झाल्याने तनुज दु:खात होता. साखरपुडय़ात सर्व आप्तेष्ट राहतील मात्र आजी राहणार नाही, या विचारांनी तनुज दु:खात होता. मात्र आपली आजी नसली तरी काय झाले? वृध्दाश्रमात नातवाच्या प्रेमाच्या नेहमी शोधात असलेल्या आजी-आजोबांसोबत साखरपुडा करण्याचा निर्णय तनुजने घेऊन सोमवारी केशवस्मृती प्रतिष्ठानच्या मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोंबासोबत प्रीती सोळुंखे हिच्या सोबत साखरपुडा केला.
मातोश्री वृध्दाश्रमातील आजी-आजोबांसाठी खास जेवण तयार केले होते. यावेळी आजी-आजोबांनी नवदाम्पत्याला आशीर्वाद दिले. मातोश्री वृध्दाश्रमाचे प्रभाकर जाधव, तनुजचे वडील रवींद्र सैंदाणे, आई सुरेखा सैंदाणे, प्रीतीचे वडील राजाराम सोळुंखे, आई सरला सोळुंखे, भाऊ जतिन, मामा शैलेंद्र आणि मामी ज्योती सोनवणे, मावशी मीना, मामा अरुण हे उपस्थित होत़े याप्रसंगी काही आजी-आजोबांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले होते.