जळगाव- उच्च शिक्षण विभागाकडून प्राध्यापकांच्या वेतन निश्चितीच्या प्रकरणांसाठी आर्थिक मागणी होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर एन.मुक्ता संघटनेकडून नुकतेच सहसंचालक डॉ़ प्रशांत मगर यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त करण्यात आली़ तसेच आठ दिवसात प्रकरणे निकाली काढावीत अन्यथा बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विभागातील महाविद्यालयीन व विद्यापीठा शिक्षकांचे सातवा वेतन आयोग लागू करण्यासंदर्भात वेतन निश्चिती शिबीर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने कुठलाही मोबदला न घेता विहित कालावधीत पार पाडले. त्यानंतर प्राध्यापकांची सर्व प्रकरणे सहसंचालक उच्च शिक्षक विभागात कार्यालयात जमा करण्यात आली. दरम्यान, महिना उलटला तरी देखील पुढील हालचाली झाल्या नाहीत. त्यातच वेतन निश्चितीच्या फाईलवर शिक्कयांसाठी किंवा इतर कामांसाठी तीन हजार रूपयांची उच्च शिक्षण विभागातून प्राध्यापकांना मागणी होत आहे. याबाबत काही प्राध्यापकांनी व प्राचार्यांनी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटीज अॅण्ड कॉलेज टिचर्स असोसिएशन (एन.मुक्ता) या संघटनेकडे धाव घेऊन तोंडी तक्रारी दिल्या. या प्रकाराची दखल घेत एन.मुक्ता संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ.प्रशांत मगर यांची भेट घेऊन होणा-या विलंबाबात आणि आर्थिक मागणीबाबत नाराजी व्यक्त केली. तसेच आठ दिवसात सर्व प्रकरणे निकाली काढावीत अन्यथा १९ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत संघटनेकडून बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला व त्यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर संघटनेकडून उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनाही निवदेनाची प्रत पाठविण्यात आली आहे.यांची होती उपस्थितीसहसंचालक डॉ़ मगर यांना निवेदन देताना संघटनेचे अध्यक्ष अध्यक्ष प्रा.नितीन बारी, केंद्रीय सचिव डॉ.अविनाश बडगुजर , प्राचार्य डी.एस.सूर्यवंशी, जिल्हाध्यक्ष डॉ.प्रज्ञा जंगले, डॉ.संजय भैसे, कार्यालय मंत्री डॉ.केतन नारखेडे , डॉ.शेलार नगाव, प्रा.संजय पाटील, डॉ.गुंजाळ, प्रा. नितीन बडगुजर, प्रा.भगवान पटेल, बामखेडा, प्रा.किसन हिरोळे , तसेच जळगाव धुळे नंदुरबार येथील प्राध्यापक उपस्थित होते.
प्राध्यापकांची प्रकरणे निकाली काढा अन्यथा बोंबाबोंब आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:19 PM