जळगाव : शहरातील मेहरूण तलावलगतच्या चौपाटीवरील रस्त्यावर उभारण्यात आलेले गतिरोधक तोडण्याचा सूचना मनपा आयुक्त डॉ. उदय टेकाळे यांनी दिल्या आहेत. तसेच कोणतीही परवानगी न घेताच गतिरोधक उभारणाऱ्या मक्तेदारालादेखील नोटीस बजाविण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त डॉ.उदय टेकाळे यांनी ‘लोकमत’ शी बोलताना दिली.शहरातील सर्व गतिरोधक काढण्याच आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र, तरीदेखील मेहरूण तलावाच्या चौपाटीलगतच्या रस्त्यावर मक्तेदाराने परवानगी न घेताच गतिरोधक उभारले होते. याबाबत ‘लोकमत’ ने मंगळवारी वृत्त प्रसिध्द केल्यानंतर मनपा आयुक्तांनी याबाबतची तत्काळ दखल घेतली. शहरानजीकच्या मेहरूण तलावाच्या रस्त्यावरील तसेच कॉलनी भागातील गतिरोधक देखील काढण्याचा सूचना दिल्या असल्याचेही त्यांनी यावेळी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.गतिरोधक काढले डांबर मात्र ठेवले कायमजिल्हाधिकाºयांच्या आदेशानुसार महापालिकेने मुख्य रस्त्यावरील गतिरोधक काढले. मात्र, हे गतिरोधक काढताना जेसीबी जमिनीशी खरडून घेतल्याने गतिरोधकाच्या ठिकाणी खड्डे पडले आहेत. आधीच रस्त्यांवर खड्डे आहेत. त्यातच मनपाने गतिरोधक व्यवस्थित न काढल्यामुळे खड्डयांची अधीकच भर पडत आहे तर काही ठिकाणी गतिरोधक काढल्यानंतरची खडी व डांबर रस्त्यालगतच टाकून दिल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. परवानगी नसताना मक्तेदार कोणत्याही रस्त्यावर गतिरोधक टाकत असताना मनपा बांधकाम विभाग मात्र याकडे दुर्लक्ष का करते ? असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
मेहरुण चौपाटीच्या रस्त्यावरील गतिरोधक काढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 10:38 PM