हरी विठ्ठल भागात भरला आठवडे बाजार
जळगाव : शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जिल्हा व मनपा प्रशासनाने गेल्या महिनाभरापासून शहरातील विविध भागात भरणारे आठवडे बाजार बंद केले आहेत. मात्र मनपा प्रशासनाचे आदेश असतानादेखील शहरातील हरी विठ्ठल नगर भागात मंगळवारी आठवडे बाजार भरल्याचे चित्र पाहावयास मिळाले. या ठिकाणी भाजीपाला घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. तसेच मनपा अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाकडूनदेखील या भागात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही.
टरबूजची मागणी वाढली, मात्र भाव कमीच
जळगाव : रमजान महिन्यात टरबूजला मोठी मागणी असते, जिल्ह्यातील टरबूज उत्पादक शेतकऱ्यांकडे अनेक व्यापारी माल घेण्यासाठी येत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळत नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शहरात २० रुपये किलो दराने टरबुजाची विक्री होत आहे. तर शेतकऱ्यांच्या बांधावर व्यापाऱ्यांकडून केवळ पाच रुपये किलो दराने टरबूजची मागणी होत आहे. यामुळे टरबूज उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.
निधीच्या नियोजनासाठी मनपात आज बैठक
जळगाव : महापालिकेला कोरोनावरील उपाययोजनांसाठी राज्य शासनाकडून व जिल्हा प्रशासनाकडून काही निधी मिळाला आहे. यासह आमदार निधीअंतर्गतदेखील महापालिकेला निधी प्राप्त झाला असून, या निधीच्या नियोजनासाठी बुधवारी महापालिकेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत महापौर व उपमहापौरांसह शहराचे आमदार सुरेश भोळे हेदेखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली आहे.