जळगाव : वंचित घटकातील विद्यार्थ्यांचे शिक्षण अक्षय राहावे म्हणून अक्षय तृतीयेपासून दीपस्तंभ फाउंडेशनतर्फे इयत्ता दहावी व बारावीच्या गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी दीपस्तंभ अक्षय शिक्षण अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती दीपस्तंभ फाउंडेशनचे उपाध्यक्ष डॉ. राजेश डाबी यांनी दिली.
या अभियानाअंतर्गत आर्थिक परिस्थिती अत्यंत अडचणीची असलेले गुणवंत विद्यार्थी, दिव्यांग व अनाथ विद्यार्थी यांचे शिक्षण घेता यावे यासाठी अँड्रॉइड मोबाइल, परीक्षा फॉर्म फीस, ट्युशनस फीससाठी आर्थिक सहाय्य, पुस्तके या बाबी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गरजू विद्यार्थ्यांनी स्वतः किंवा त्यांच्या शिक्षकांनी अर्ज करताना स्वतः ची संपूर्ण माहिती, मिळवलेले यश / विशेष प्रावीण्य, कौटुंबिक माहिती, आर्थिक परिस्थिती, कोणती मदत हवी आहे, शिफारस देणाऱ्या शिक्षकांचे नाव व संपर्क असे सविस्तरपणे अर्जात नमूद करावे. आलेल्या अर्जांपैकी पडताळणीनंतर गुणवत्तेच्या आधारे व आर्थिक परिस्थितीनुसार २०० विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना संपर्क केला जाईल, असे डाबी यांनी कळविले आहे.