========
अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करा
जळगाव : शिवाजीनगर भागातून रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात वाळूची अवैधरीत्या वाहतूक केली जाते. भरधाव जात असलेल्या वाहनांमुळे मोठा अपघातही घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणाऱ्या डम्पर, ट्रॅक्टर चालकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समाजवादी पार्टीचे जळगाव जिल्हाध्यक्ष व निरीक्षक शेख मोईनोद्दीन ईकबाल यांनी केली आहे.
=======
दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था करावी
जळगाव : विद्यापीठ, महाविद्यालय व प्रशाळांमध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था व सुविधांचे नियोजन करण्यात याव्यात, अशा सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाकडून करण्यात आल्या आहेत. सदर पत्र विद्यापीठाकडून महाविद्यालय, प्रशाळांना पाठविण्यात आले असून, अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
=======
शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करावी
जळगाव : शैक्षणिक वर्ष संपलेले आहे, परंतु याची कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे राज्यातील शिक्षण क्षेत्रांमध्ये संभ्रमावस्था आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपल्याची घोषणा करण्यात यावी, पुढील शैक्षणिक वर्षाच्या नियोजनाचे वेळापत्रक जारी करण्यात यावे आदी मागणी शिक्षक भारतीच्या वतीने करण्यात आली आहे.