शिवसेनेचे आयुक्तांना निवेदन : गणेशोत्सवाआधी प्रश्न मार्गी लावा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील शिवाजीनगर भागातील पटेलवाडी भागातील रस्त्याची समस्या अतिशय बिकट झाली असून, नागरिकांना या रस्त्यावरून पायी चालणेदेखील कठीण झाले आहे. मनपा प्रशासनाने गणेशोत्सवाआधीच या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली असून, याबाबत गुरुवारी मनपा आयुक्त सतीश कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.
या वेळी शिवाजीनगर भागातील विभागप्रमुख विजय बांदल, कार्यालयप्रमुख संजय सांगाळे, गणेश मोझर, किरण ठाकूर व मधुकर साबळे उपस्थित होते. या निवेदनात म्हटले होते की, या भागातील गणेशमूर्ती तयार करण्याचा कारखाना असून, बऱ्याच मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. या ठिकाणाहून आता मूर्तिकारांना आपल्या मूर्ती शहरात आणताना चांगलीच कसरत करावी लागत आहे. रस्त्यांवर पूर्णपणे चिखल असल्याने मूर्ती तुटण्याची शक्यता आहे. यामुळे मूर्तिकारांचे नुकसान होऊ शकते. तसेच नागरिकांनादेखील या रस्त्यांवरून पायी चालताना त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांना नेहमी होणारा त्रास लक्षात घेता मनपा प्रशासनाने तत्काळ या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.