जळगाव : जैन धर्माच्या दीक्षा समारंभाविषयी अमळनेर येथे लावण्यात आलेले स्वागत बॅनरवरून उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी केलेल्या कारवाईनंतर उद्भवलेल्या वादप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गायकवाड यांना सूचना दिल्या असून या प्रकरणाचा प्राथमिक अहवाल नगर विकास विभागाला पाठविला आहे.
अशी घडली होती घटना
विनय बागरेचा या एक शालेय विद्यार्थाने दीक्षा घेतल्याने गेल्या आठवड्यात या विषयीचे बॅनर अमळनेर शहरात लावण्यात आले होते. मात्र उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनी तीन-चार कर्मचाऱ्यांसह हे बॅनर काढले. केवळ जैन समाजाचे बॅनर का काढतात ? काही दिवसांपूर्वी राजकीय पक्षांचे बॅनर का काढले नाही, इतरही बॅनर आहेत या कारणावरून जैन समाजाचे तरुण एकत्र आले होते. जैन समाजाने नाराजी व्यक्त करीत गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी गायकवाड यांनी फेसबुक , व्हाट्स अप आणि पत्रकाद्वारे दिलगिरी व्यक्त केली खरी पण वाद चिघळल्याने काही तरुणांनी आक्रमक भूमिका घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. यात गायकवाड यांनीही तक्रार केली व गुन्हा घेतला नाही म्हणून त्यांनीही आत्महत्येचा इशारा दिला आणि बेपत्ता झाले होते. त्यानंतर या प्रकणात गुन्हे दाखल दाखल झाले. त्यात पुन्हा नाराजीचा सूर उमटला. त्यात जे घटनास्थळी नव्हते त्यांचीही नावे टाकण्यात आल्याने गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी जोर धरू लागली होती. यात उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांच्याविरोधातही गुन्हा दाखल झाला होता.
आत्महत्येच्या धमकीने चर्चेला आले उधाण
गायब होणे, आत्महत्येची धमकी देणे असे प्रकार अधिकाऱ्याकडून होऊ लागल्याने हा विषय चांगलाच चर्चेचा झाला. या विषयी जैन समाज बांधवांच्या राष्ट्रीय कार्यकारीणीपर्यंत पोहचला. या विषयी नगर विकास विभागानेही माहिती मागविली.
सामाजिक, भावनिक प्रश्न जपून कारवाई करा
जिल्ह्यात झालेल्या या वादप्रकरणी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी गायकवाड यांना सूचना दिल्या. कोणत्याही प्रकरणात कारवाई करा, मात्र त्याच्याशी निगडीत सामाजिक, भावनिक प्रश्न जपा, संबंधितांना विश्वासात घेऊन कारवाई करा, अशा सूचना दिल्या. या विषयीचा अहवाल जिल्हाधिकारी राऊत यांनी नगरविकास विभागाला पाठविला असून यात घटनाक्रमाची माहिती देण्यात आली आहे.