जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी संध्याकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार उन्मेष पाटील, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याशी उपाययोजनांविषयी चर्चा केली. जिल्ह्यात आरएनए एक्स्ट्रॅक्ट किटचा तुटवडा असल्याने तपासणी अहवाल येण्यास विलंब होण्यासह लसींचाही तुटवडा भासत असल्याचे समोर आले.
गेल्या महिन्यापासून जिल्ह्यात व जळगाव शहरात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने, या विषयी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. जिल्ह्यात येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा झाली असता, स्वॅबच्या तपासणीसाठी आवश्यक असलेल्या आरएनए एक्स्ट्रॅक्ट किटचा तुटवडा असल्याचे समोर आले. या किट असल्यास तपासणी वेगाने होऊन अहवालही लवकर येतो. मात्र, या किट उपलब्ध होत नसल्याचे सांगण्यात आल्याने, महाजन यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, डॉ.अर्चना पाटील, डॉ.सतीश पवार यांच्याशी चर्चा करून या किट उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
या सोबतच जिल्ह्यासाठी ७५ हजार कोरोना लस उपलब्ध झाल्या. मात्र, सध्या लसींचा तुटवडा जाणवत असल्याचेही यावेळी समजले. त्यामुळे लसींचा वाढीव साठाही उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे उन्मेष पाटील, गिरीश महाजन यांनी सांगितले. या शिवाय लसीकरण केंद्र, कोविड केअर सेंटर, बेडची संख्या वाढवा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी राऊत यांना दिल्या.
यावेळी मनपा स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, नगरसेवक धीरज सोनवणे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस डॉ.राधेश्याम चौधरी हेही उपस्थित होते.