जळगाव : बीएचआरमधील प्रकरणात पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक पुन्हा जळगावात दाखल झाले असून या पथकाने सुनील झंवर याच्या कार्यालयातील कर्मचारी व बाहेरील दोन अशा सहा जणांचे जबाब नोंदविले तर झंवर, जितेंद्र कंडारे व अटकेतील संशयितांच्या बँक खात्याची माहीतीही दोन दिवसात काढली. दरम्यान, या गुन्ह्यात कंडारे व झंवर अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
पुण्यात तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वात नोव्हेंबर महिन्यात १३५ जणांच्या पथकाने शहरात धाडसत्र राबविले होते. विवेक ठाकरे, महावीर जैन, धरम साखंला, सुजीत वाणी, यांच्यासह कंडारेचा चालक कमलाकर भिकाजी कोळी यास अटक झाली होती. पुण्यात सुरु असलेल्या तपासाच्या अनुषंगाने या सर्व संशयितांच्या बँक खात्यांची माहिती काढण्यासाठी दोन अधिकारी व तीन कर्मचारी अशा पाच जणांचे पथक शुक्रवारी शहरात दाखल झाले. आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात सुनील झवर याच्या कार्यालयातील चौघांचे दिवसभरात चार जणांचे जबाब नोंदविण्यात आले. शनिवारी दोघांचे जबाब नोंदविण्यात आले.
थकबाकीदार रडारवर
बीएचआर प्रकरणात अपहार व फसवणुकीची व्याप्ती पाहता ज्या लोकांनी संस्थेची मालमत्ता खरेदी केलेली आहे, अशांसह थकबाकीदारही रडारवर असून त्यांचीही चौकशी करुन जबाब नोंदविले जाणार आहेत. हे काम साधारण दहा ते पंधरा दिवस चालणार आहे. या सर्वांना टप्प्याटप्प्याने चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. चौकशी व जबाबासाठी जळगावातील काही जणांना समन्स बजावण्यात आले होते, त्यापैकी फक्त दोनच जण पुण्यात हजर झाले, त्यामुळे पथक थेट जळगावातच धडकले. थकबाकीदार, साक्षीदार व तपासात जे नावे निष्पन्न होतील, त्यांचे जबाब नोंदविले जाणार आहेत. दरम्यान, अटकेतील जामीन अर्ज पुणे न्यायालयाने फेटाळल्यानंतर काही जणांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे, त्यावर मंगळवारी कामकाज होणार असल्याचे वृत्त आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयाच्याही नोंदी तपासणार
पोलिसांनी केलेल्या तपासात मालमत्ता खरेदी विक्रीतही मोठा घोटाळा झाल्याचे समोर येत आहे. बनावट वेबसाईटच्या माध्यमातून सुनील झंवर व इतरांनी ज्या मालमत्ता खरेदी केलेल्या आहेत, त्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत, त्याशिवाय ज्या मालमत्ता अधिकृत वेबसाईटवरील निविदांच्या माध्यमातून खरेदी व विक्री झालेल्या आहेत, त्यादेखील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. या सर्व मालमत्तांची दुय्यम निबंधक कार्यालयातही नोंदी तपासल्या जाणार आहेत. जळगाव, चाळीसगाव, अमळनेर, शेंदुर्णी,पुणे, हवेली, नागपूर, फलटन, जि.सातारा, लातूर, सांगवी, जि.पुणे,देऊळगाव माही, जि.बुलडाणा, बारामती, शिरुर, जि. पुणे, कुसुंबा,ता.जळगाव,भुसावळ, टोणगाव, भडगाव यासह इतर ठिकाणच्या मालमत्ता खरेदी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत.
कोट....
पाच जणांचे पथक जळगावला पाठविले आहे. थकबाकीदार, साक्षीदार यांचे जबाब व कागदपत्रांची पूर्तता घेण्याचे काम सुरु आहे. तपासाला किती दिवस लागतील ते सांगता येणार नाही, मात्र पूर्ण कामकाज झाल्यावरच पथक पुण्याला येईल.
-भाग्यश्री नवटके, उपायुक्त, आर्थिक गुन्हे शाखा पुणे