जळगाव : जिल्ह्यात बर्ड फ्लूबाबत खबदारी म्हणून पाच ठिकाणच्या कोंबड्यांना तपासणीसाठी भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते. या कोंबड्यांचे गेल्याच आठवड्यात अहवाल निगेटिव्ह आले. यामुळे जिल्ह्यात बर्ड फ्लू नसल्याचा दावा यंत्रणेने केला आहे. मात्र, खबरदारी म्हणून योग्य त्या उपायोजना राबविल्या जात असल्याची माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्यामकांत पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील चिंचपुरा, ता.धरणगाव, जळू ता. एरंडोल, मनवेल, ता. यावल, जळगाव, बहाळ, ता,चाळीसगाव आणि जामनेर या ठिकाणच्या साधारण २० ते २५ कोंबड्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या होत्या. त्या ठिकाणी विभागाचे डॉक्टर, कर्मचारी यांनी जाऊन मार्गदर्शन केले आहे. पाहणी करण्यात येत असून सर्व खबरदारी बाळगली जात असल्याचे डॉ. श्यामकांत पाटील यांनी सांगितले.
६४ कर्मचारी १६ टीम
नवापूर येथे बर्ड फ्लू जाहीर करण्यात आला आहे. त्या दृष्टीने त्या ठिकाणी कोंबड्या नष्ट करण्यासह विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यासाठी कमी कर्मचारी संख्या असल्याने जळगावातून १६ पथके पाठविण्यात आली आहे. या पथकात प्रत्येकी एक पशुधन अधिकारी आणि अन्य तीन कर्मचारी यांचा समावेश आहे. तेथील परिस्थितीनुसार हे पथक तिथे उपाययोजना राबविणार आहेत, असे जि.प. पशुसंवर्धन अधिकारी एम. इंगळे यांनी सांगितले.
बर्ड फ्लूचा धोका किती?
पोल्ट्रीत काम करणारे, चिकन विक्री करणारे अशांना याची लागण होण्याची शक्यता असते. सामान्यांना याचा धोका त्या मानाने कमी असतो, साधारण सर्दी, ताप, न्यूमोनिया अशी याची लक्षणे असतात, अशी माहिती औषध वैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी दिली. मात्र, अन्य व्याधी असलेल्यांना याचा धोका अधिक उद्भवू शकतो, असेही त्यांनी सांगितले. पक्ष्यांपासून याचा संसर्ग झाल्यास एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होण्याचे प्रमाण कमी आणि गंभीर नसते, असेही ते म्हणाले.
पक्ष्यांना झालाय कसे ओळखाल
कोंबडी किंवा अन्य पक्षी त्यांना खायला देऊनही खात नसतील, गुंगीत वाटत असतील, चालत-फिरत नसतील आणि अचानक त्यांचा मृत्यू होत असेल तर त्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याची शक्यता असते. अशा पक्ष्यांना नष्ट करण्याशिवाय पर्याय नसतो, असेही तजज्ञांचे म्हणणे आहे.