पोलीस दल : बदल्यांची प्रक्रिया सुरू
जळगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदा कोणत्याच बदल्या होणार नाहीत, असे सांगितले जात असले तरी तसे कोणतेही आदेश अजून तरी प्राप्त झालेले नाहीत. जळगाव जिल्हा पोलीस दलात मात्र बदल्यांची प्रक्रिया सुरू झाली आहे. बदलीस पात्र असलेले शिपाई ते सहायक फौजदार यांची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मागवली आहे.
एका पोलीस ठाण्यात अथवा एका ठिकाणी पाच वर्षे कार्यकाळ पूर्ण झालेले तसेच एका तालुक्यात १२ वर्षे पूर्ण झालेले (खंडित व अखंडित) अमलदार यांची माहिती ७ मेपर्यंत पोलीस अधीक्षक कार्यालयात मागवण्यात आलेली आहे. त्याशिवाय जे अंमलदार स्वतःच्या तालुक्यात कार्यरत आहेत, अशांचीही माहिती मागवलेली आहे.
*७ मेपर्यंत माहिती संकलित*
मे महिना हा सर्व शासकीय कार्यालयांमध्ये बदल्यांचा महिना समजला जातो. ७ मेपर्यंत विहित नमुन्यात माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्तीबाबत अंमलबजावणी केली जाईल. गरज भासल्यास अंमलदारांना बोलावण्यात येईल, किंवा गेल्या वर्षीप्रमाणेच मोबाईलवर संपर्क साधून प्रक्रिया राबवली जाईल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
*मागील वर्षी बदली पात्र अंमलदार खूश*
मागील वर्षी तत्कालीन पोलीस
अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी दोन वेळा बदली पात्र अमलदारांची संपूर्ण माहिती संकलित केली होती. परंतु ऐनवेळी बदल्यात करण्यास त्यांनी टाळले होते. त्यांच्या बदलीनंतर नव्याने दाखल झालेले डाॅ. प्रवीण मुंढे व तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी ही बदली प्रक्रिया राबवली होती. मुंढे यांनी यामुळे प्रत्यक्ष कर्मचाऱ्यांना कार्यालयात न बोलावता त्यांच्याकडून विहित नमुन्यात माहिती मागवून तीन पसंतीक्रम विचारले होते. त्यानंतर या अंमलदारांशी प्रत्यक्ष मोबाईलवर संपर्क साधून त्यांच्याकडून पुन्हा नियुक्तीचे तीन ठिकाणी विचारले होती. जेथे जागा रिक्त नाही किंवा काही कारणास्तव नियुक्ती देणे शक्य नाही, अशा अंमलदारांना पुन्हा विचारणा करण्यात आली होती. जवळपास सर्वच अंमलदारांना आपल्या मनानुसार नियुक्त्या मिळाल्या होत्या. त्यामुळे अमलदार खूश होते. यंदाही त्याच पद्धतीने बदल्या होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गेल्या वर्षी एकाही अंमलदाराने बदलीबाबत तक्रार केली नव्हती.