अनेक प्रभागांमध्ये रस्ते दुरुस्तीला मुहूर्ताची प्रतीक्षा
जळगाव : शहरातील प्रत्येक प्रभागातील रस्ते दुरुस्तीच्या कामांना मंजुरी मिळाली असून, काही प्रभागांमध्ये कामाला सुरुवात देखील झाली आहे. मात्र, अद्यापही ६-७ प्रभागांमधील कामांना सुरुवात झालेली नाही, शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून, यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रस्ते दुरुस्तीच्या कामांना सुरुवात करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.
आव्हाणे, खेडी परिसराला पावसाने झोडपले
जळगाव- अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे जिल्ह्यात काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे. त्यात मंगळवारी सायंकाळी पाच वाजता जळगाव तालुक्यातील आव्हाणे, खेडी, वडनगरी या परिसराला पंधरा मिनिटे जोरदार पावसाने चांगलेच झोडपले. वादळासह झालेल्या पावसामुळे केळीच्या बागाला काही प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच वृक्ष कोलमडल्याने दोन ते तीन तास वीज पुरवठा खंडित झाला होता.