लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : पेटंट हे बौद्धिक संपदेचे महत्त्वाचे अंग आहे. बौद्धिक संपदा म्हणजे बुद्धीचा वापर करून निर्माण केलेली संपदा. आपण लावलेला शोध समाजोपयोगी ठरू शकतो त्यावरच पेटंट अवलंबून असते. युवकांनी केलेल्या संशोधनाचे जतन करण्यासाठी पेटंट करून घेणे आवश्यक असल्याचे मत डॉ. तेजोमयी भालेराव यांनी व्यक्त केले. फुलापासून इन्स्टंट सूप तयार करून भारतीय पेटंट संशोधनाकडून नुकतेच डॉ. भालेराव यांनी पेटंट प्राप्त केले आहे. पेटंट काय असते, व कोणत्या संशोधनासाठी प्राप्त होते याबाबतची माहिती डॉ. भालेराव यांनी ‘लोकमत’ला दिली.
प्रश्न - कोणत्या प्रकारच्या संशोधनाला पेटंट प्राप्त होते ?
डॉ. भालेराव - जगात बौद्धिक संपदेचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये कॉपीराइट, ट्रेडमार्क, भौगोलिक उपदर्शन (जीआय) इत्यादींचा समावेश होतो. एखाद्या व्यावसायिकाला त्याच्या व्यापार चिन्हासाठी ‘ट्रेडमार्क’ ही बौद्धिक संपदा घेता येते, तर एखाद्या लेखकाला, चित्रकाराला त्याच्या कलेची नोंद ‘कॉपीराइट’ या बौद्धिक संपदेअंतर्गत करून घेता येते, त्यात विविध प्रकार असतात, प्रत्येक देशाचे स्वतंत्र पेटंट असते. जे संशोधन समाजोपयोगी पडते त्याच संशोधनाला पेटंट दिले जाते.
पेटंट नोंदविण्याची प्रक्रिया कशी आहे ?
एखादे संशोधन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला वाटेल की ते संशोधन आपणच केले आहे किंवा याआधी ते संशोधन झालेले नसावे, भारतीय पेटंट संस्थेकडे ही नोंद करावी लागते. यासाठी काही एजंटदेखील असतात. त्यांना ही माहिती किंवा संशोधन द्यावे लागते. पेटंट संस्थेचे प्रतिनिधी नंतर त्या संशोधनाची पडताळणी करतात. आधी ते संशोधन झाले की नाही, याबाबतची तपासणी केल्यानंतरच संशोधनाला पेटंट दिले जाते. पेटंट हे त्या-त्या देशापुरते किंवा प्रदेशापुरते मर्यादित असते. म्हणजे, भारतात नोंदवलेले पेटंट कोणी युरोपमध्ये वापरले, तर तुम्ही केस करू शकत नाही.
आपल्या कोणत्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे?
केळीच्या फुलापासून इन्स्टंट सूप बनविण्याच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. सध्या लीलावती रिसर्च सेंटरच्या माध्यमातून संशोधनाला वाव मिळावा म्हणून काम करीत आहे. त्यातील काही संशोधनांवर आता काम सुरू असून, यावर तीन ते चार विद्यार्थिनी काम करीत आहेत.
कोट
आपल्याकडे अनेक संशोधने झाली आहेत. मात्र, ती केवळ पोथीपुराणातच अडकून पडली आहेत. अनेक संशोधनांना संशोधकांनी उजेडात आणले आहे. आजच्या युवकांनीदेखील संशोधन केवळ आपल्यापर्यंत मर्यादित न ठेवता ते समाजापर्यंत आणण्याचे काम केले पाहिजे.
- तेजोमयी भालेराव, संचालिका, लीलावती रिसर्च सेंटर