जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशाळेद्वारा ऑनलाईन ‘आंतरराष्ट्रीय पदार्थविज्ञान परिषद-२०२१’ (इंटरनॅशनल मटेरियल सायन्स कॉन्फरन्स-२०२१) बुधवारपासून प्रारंभ झाली.
या कॉन्फरन्समध्ये २० देशांतील ५०० प्रतिनिधी सहभागी होणार असून परिषद तीन दिवस चालणार आहे. अमेरिका, इंग्लंड, कोरिया व स्पेन या देशांतील व भारतातील वैज्ञानिक प्रथितयश संस्थांमधील शास्त्रज्ञ तसेच भारत व इतर देशांतील शिक्षक आणि संशोधक विद्यार्थी या परिषदेत आपले संशोधन सादर करणार आहेत. पदार्थविज्ञान हा भौतिकशास्त्रातील एक महत्त्वाचा उपयोजित विषय असून वेगवेगळ्या प्रकारचे संवेदक, सोलर सेल्स तसेच इतर इलेक्ट्रॉनिक्स साधने, नॅनो तंत्रज्ञान यात पदार्थविज्ञानाचा खूप मोठा महत्त्वाचा वाटा असल्याने विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र प्रशालेतील प्राध्यापक आणि विद्यापीठांतर्गत अनेक संशोधक विद्यार्थी पदार्थविज्ञान या विषयात संशोधन करत आहेत. त्यांना या परिषदेचा फायदा होणार आहे. भौतिकशास्त्र प्रशाळेचे प्रा.संजय घोष हे परिषदेचे संयोजन असून सहसंयोजक म्हणून प्रा.जसपाल बंगे काम पाहत आहेत. या परिषदेस प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, प्रभारी कुलसचिव प्रा.ए.बी.चौधरी, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा.आर.एस.पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.