लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी प्रत्येकाने पक्षभेद व आपापसातील हेवेदावे विसरून काम करण्याची गरज आहे. विद्यमान सरकारने न्यायालयात आरक्षण प्रकरणी ५०० कागदपत्रे सादर न केल्यामुळे मराठा आरक्षण न्यायालयात टिकले नाही असा आरोप माजी खासदार नीलेश राणे यांनी केला आहे.
सोमवारी हौसिंग सोसायटीमध्ये मराठा आरक्षणासंदर्भात दुपारी ४ वाजता नीलेश राणे यांनी मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान ते बोलत होते. यावेळी प्रा.डी.डी. बच्छाव, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, विनोद देशमुख, भीमराव मराठे, नगरसेवक जितेंद्र मराठे, संतोष पाटील , अजय पाटील, सुरेंद्र पाटील यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
४७ समाज बांधवांचे बलिदान वाया जाऊ देऊ नका
माजी खासदार राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, मराठा समाजातील ४७ बांधवांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, मराठा समाजाचा आरक्षणासाठी ज्या युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत ते गुन्हे मागे घेण्यासाठी शासनाला भाग पाडू असेही आश्वासन राणे यांनी दिले. न्यायालयात जरी आरक्षण टिकले नसले तरीही लढाई आता अर्ध्यावर सोडून चालणार नाही. यासाठी सर्व समाज बांधवांना एकत्र येण्याची गरज असल्याचेही राणे यांनी सांगितले.
मराठा आरक्षणाबाबत नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रिया
यावेळी मराठा आरक्षणाबाबत उपस्थितांनी आपल्या संतप्त भावना माजी खासदार राणे यांच्यासमोर मांडल्या. यात आमदार मंगेश चव्हाण, डी.डी.बच्छाव, लोकसंघर्षच्या प्रतिभा शिंदे, विनोद शिंदे, भीमराव मराठे, प्रा. सुनील गरुड, संतोष पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत आपल्या भावना मांडत या अखेरच्या क्षणी आम्ही मागे हटणार नसल्याचे सांगितले. तसेच सर्वजण पक्ष, हेवेदावे, विचार सर्व बाजूला ठेवून एकत्र येतील असेही आश्वासन मराठा समाज बांधवांनी यावेळी दिले.