जळगाव : जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे बाधित रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने खासगी कोरोना रुग्णालयांमध्ये दाखल रुग्णांना वेळेवर व नियमित मेडिकल ऑक्सिजन पुरवठा होणे आवश्यक आहे. यासाठी एकूण उत्पादित ऑक्सिजनपैकी ८० टक्के ऑक्सिजनचा साठा रुग्णालयांना पुरवठा करा व उर्वरित २० टक्के साठा औद्योगिक वापरासाठी द्या, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना दिले. रुग्णालयांना वेळेवर व नियमित ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशारादेखील देण्यात आला आहे.
उत्पादन वाढविण्यासाठी त्वरित उपाययोजना करा
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून रुग्णांना ऑक्सिजनदेखील आवश्यकता भासत आहे. अशा स्थितीत खासगी कोरोना रुग्णालयांना त्यांच्या मागणी व आवश्यकतेनुसार नियमित व तत्काळ मेडिकल ऑक्सिजन पुरवठा केला जात नसल्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राऊत यांनी तीन ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना आदेश देऊन या कंपन्यांनी पूर्ण क्षमतेने ऑक्सिजनची निर्मिती करावी व उत्पादन वाढविण्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या आहे. यामध्ये एकूण उत्पादित ऑक्सिजनपैकी ८० टक्के साठा रुग्णालयांना वितरित करण्यात यावा व २० टक्के साठा इतर औद्योगिक उत्पादकांना आवश्यकतेनुसार करावा, असे आदेशात म्हटले आहे.
ऑक्सिजन उत्पादनात अडथळा येऊ नये म्हणून वीजपुरवठादेखील अखंडितपणे सुरू राहावा यासाठी संबंधित कंपनी, संस्थांनी जनरेटरची व्यवस्था करावी तसेच पुरवठा सुरळीत होण्यासाठी वाहतुकीविषयीदेखील सूचना देण्यात आल्या आहेत.
महावितरणला सूचना
ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांचा वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणनेदेखील दक्षता घ्यावी, अशा सूचना महावितरण कंपनीला या आदेशाद्वारे देण्यात आल्या आहेत.
खासगी रुग्णालयांनी रिकामे सिलिंडर खरेदी करावे
मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा कोरोना व इतर रुग्णालयांनाच होत असल्याबाबत खात्री करून तो इतरत्र वळविण्यात येऊ नये याविषयीदेखील दक्षता घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. खासगी रुग्णालयांनी त्यांचे स्वतःचे रिकामे सिलिंडर खरेदी करावे व या एजन्सीमार्फत भरणा करून घ्यावा, ती खासगी रुग्णालयांची जबाबदारी राहणार असल्याचे आदेशात स्पष्ट केले आहे.
वेळेवर ऑक्सिजन न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने खासगी कोरोना रुग्णालयांना नियमित व तत्काळ मेडिकल ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात यावा. या कामात टाळाटाळ व दिरंगाई आढळून आल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकारी राऊत यांनी दिला आहे.